विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामतीमध्ये आज नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नमो महारोजगार मेळाव्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, डॉ. नीलम गोऱ्हे, मंगलप्रभात लोढा यांची मंचावर उपस्थिती होती. महारोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर भाषणासाठी शरद पवारांचं, अजित पवारांचं आगमन होताच बारामतीकरांनी एकच जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट केल्याचं पाहायला मिळालं.
यावर बिग बॉस मराठीमधून लोकप्रिय झालेले अभिनेते किरण माने नमो महारोजगार मेळाव्यातील शरद पवारांचा व्हिडीओ शेअर करत लिहितात, आपल्या हद्दीत येऊन पोकळ माज करू पहाणार्या शत्रूच्या छावणीत घुसून त्याचा धुव्वा कसा उडवायचा… ही जिगरबाज वृत्ती पवारसाहेबांकडूनच शिकावी!
पवारांच्या वयात, या स्टेजवर बसलेल्या गावगुंडांची काय दयनीय अवस्था झाली असेल याची कल्पनाच न केलेली बरी!
साहेबांना पाहून जनतेने उत्स्फूर्तपणे केलेला जल्लोष प्रत्येकाच्या नशिबात नाही येत. साहेबांच्या सभेत यातल्या एकानेही अशी अचानक स्टेजवर जायची हिंमत करावी. ‘जरांगेंनी दिलेल्या शिव्या बर्या होत्या’ असं म्हणायची वेळ येईल.
ही ‘चाल’ पावसातल्या सभेपेक्षा शंभरपट खतरनाक परीणाम करणार आहे यावेळी! बख्खळ आले आन् मायंदाळ गेले, गड्याहो…पवारसाहेब हा महाराष्ट्राच्या जनतेच्या काळजातला विषय हाय… जरा थंड घ्या. असे किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.











