विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आल होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती.
यावेळी बारामतीतील अद्ययावत बसस्थानक, बारामतीतील बऱ्हाणपुर येथील पोलीस उप मुख्यालय आणि बारामती शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व शहर पोलीस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन ऑनलाईन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता माझ्यामागे लोकं लागतील की, मला बारामतीलाच पोस्टींग द्या. कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान केवळ बारामतीमध्येच आहे. दादा मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की, तुम्ही स्वत: लक्ष घालून एवढ्या चांगल्या इमारती बांधल्या.
मला आता मोह होत आहे की, आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, तिथं पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करावं. म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील. पण दादा मला हळूच म्हणू शकतील की, पीएमसी कशाला, खातंच माझ्याकडे द्या. पण दादांना खातं देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेन. मात्र तुमची मदत ह्या चांगल्या इमारती बांधण्याकरिता निश्चित घेईल असे देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवारांनी नमो रोजगार मेळाव्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या मेळाव्यासह बारामतीमधील बस स्थानक आणि पोलीस आयुक्तांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. अजित पवारांच्या नेतृत्त्वात बारामतीमधील बस स्थानक हे एखाद्या विमानतळासारखं वाटाव एवढं सुंदर व सुसज्ज आहे. बारामतीमधील पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त कार्यालय किंवा पोलिसांच्या क्वार्टर्सच्या इमारती पाहिल्यावर हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं असावं, एवढं सुंदर कार्यालय अजित दादांनी बारामतीकरांना दिलं आहे. असे फडणवीस म्हणाले.
५५ हजार पदं अधिसूचित आहेत. उद्योगांना मानव संसाधनांची गरज असते. आम्हाला रोजगार हवाय ही विद्यार्थ्यांची ओरड असते. आता रोजगार देणारे आणि घेणारे यांची एकत्र सांगड घातली गेली आहे. अजितदादांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्रात नमो महारोजगार मेळावा चांगल्या पद्धतीने आयोजित केला आहे. पण चांगलं काम करायचं असेल तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती हेच दाखवते, की आम्ही सगळे मिळून एकत्र काम करु शकतो.असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की आम्ही राजकारणात काम करणारी मंडळी कंत्राटी कामगार आहोत. आम्हाला दर पाच वर्षांनी कंत्राटाचे नूतनीकरण करावे लागते. चांगले काम केले तर जनता आमच्या कंत्राटाचे नूतनीकरण करते आणि चांगले काम केले नसेल, तर लोक आम्हाला घरी बसवितात. पण चांगले काम केले तर जन्मभर प्रगती होत असते. बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या या इमारती आहेत यातून लोकांची कामे होतील. असेही देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये बोलताना म्हणाले.











