नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
केंद्र शासनाने फेब्रुवारी महिन्यापासून एक अट लागू केली आहे. साखरेच्या ठरवून दिलेल्या कोट्यापैकी 90% कोट्याची साखर विक्री करण्याचे बंधन घातले आहे. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात साखर बाजारात येऊन साखरेच्या दरात क्विंटल मागे 250 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे साखर विक्रीच्या टेंडरमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग कमी झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेर दिलेला साखरेचा कोटा विकणे साखर कारखान्यांना शक्य झालेले नाही अशा परिस्थितीमध्ये हे 90% साखर विक्रीचे बंधन शिथिल करावे अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली.
राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेऊन वरील मुद्द्यांवर चर्चा केली. याच मुद्द्यांमध्ये आणखी एक मुद्दा महत्त्वाचा होता. साखर विक्रीची किमान किंमत आता बदलण्याची गरज आहे. हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे.
कारण केंद्र शासनाने फेब्रुवारी 2019 मध्ये साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो 31 रुपये घोषित केला आहे मात्र त्यानंतरच्या पाच वर्षाच्या काळात उसाचा दर प्रत्येक वर्षी वाढत गेला, मात्र त्या तुलनेत साखरेची किंमत वाढवली गेलेली नाही. हा वाढीव दर शेतकऱ्यांना वेळेत आणि पूर्ण देण्यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात आता वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे.
केंद्र सरकारच्या साखर नियंत्रण कायदा 2018 मधील चौथ्या क्रमांकाची अट लक्षात घेता ऊस दराशी निगडित साखर विक्रीची किंमत ठरवून ती आता प्रति किलो चाळीस रुपयापर्यंत करण्याची गरज आहे. या दराबाबत केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने देखील आपल्या अहवालात दुजोरा दिला आहे, हे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखालील बैठकीत घेण्यात आला आणि त्यानंतर लागलीच राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाची शिष्टमंडळ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले.
शहा यांनी घेतली दखल! अन्न मंत्रालयाबरोबर झाली चर्चा!
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अमित शहा यांनी तातडीने निर्देश दिले आणि त्यानुसार 29 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा, साखर सहसचिव अस्वनी श्रीवास्तव, मुख्य साखर संचालक संगीत सिंगला व साखर विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने देशभरातील साखर कारखाना तसेच संपूर्ण साखर उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या विषयवार विस्ताराने मांडल्या.











