सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा नुकताच इंदापूर तालुक्यात दौरा सूरु असताना त्या इंदापूर शहरातून जात असताना युवा नेते राहुल गुंडेकर व त्यांच्या शहर व तालुक्यातील सहकारी युवकांनी सुळे यांच्या वाहनांचा ताफा थांबवून सुळे यांना निवेदन दिले इंदापूर शहराच्या विकासाच्या मागण्या केल्या. यावेळी सुळे यांनी युवकांच्या मागण्यांची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
राहुल गुंडेकर व त्यांच्या सहकारी युवा कार्यकर्त्यांनी शहरातील विकासासाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदापूर तालुक्यातील व आसपासच्या गावातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही गावातील लोकांना इंदापूर शहरात उपचारासाठी यावे लागते, परंतु छोटे मोठे आजार झाले, तरी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अकलूज, बारामती, पुणे, सोलापूर या ठिकाणी उपचारासाठी जावे लागते.
त्यासाठी इंदापूर शहरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ची गरज आहे त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. तसेच शहरामध्ये अनेक वर्षापासूनची गरज असलेल्या महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटलसाठीआपण पुढाकार घेऊन हे हॉस्पिटल उभा करावे आपण या कामी लक्ष घातल्यास इंदापूरकरांची अनेक वर्षाची प्रतिक्षेला विराम मिळणार आहे अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
इंदापूर शहरामध्ये तणावमुक्त जीवन जगण्यासाठी व लहान मुलांसाठी बाल उद्यान असावे. बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय शहरांमध्ये किंवा परिसरामध्ये यावेत यासाठी प्रयत्न करावा. तसेच सुसज्ज मोठे आधुनिक स्वरूपाचे आपल्या पुढाकारातून शहरांमध्ये वाचनालय, गोरगरिब मुलांसाठी सुसज्ज असे वसतिगृह, अनेक छोटी छोटी क्रीडांगणे असणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रॅक असावा,अशा मागण्या केल्या. यावर सुप्रिया सुळे यांनी बगीचासह इतर मागण्या लवकर सोडविल्या जातील असे आश्वासन युवकांना दिले.











