दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारुन पोलीस निरीक्षक नारायण देशुभख यांना महिना झाला आहे. महिन्यांनंतर पहिली कारवाई त्यांनी यवत हद्दीत असलेल्या बेकायदा गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून केली आहे. या कारवाईत १ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असुन संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आल्या. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची बदली झाली. दौंड पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार चंद्रशेखर यादव यांनी स्वीकारला.
दौंड पोलीस ठाण्याचे सुत्र हातात घेताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शहरातील बेशिस्त अतिक्रमणे काढून, वाकडीतिकडी वाहने लावून वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर ही मोठी कारवाई केली. गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक केले.
चोरीतील आरोपीही जेरबंद केले. यादव फक्त अवैध धंद्यावर कारवाईच करून थांबले नाहीत, तर शाळा महाविद्यालये मधील विद्यार्थींशी संवाद साधत मार्गदर्शन केले. तसेच शालेय मुली व महिलांची छेडछाड करणाऱ्या रोडरोमींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. सामाजिक उत्सव व महापुरुषांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांची शहरातून परेड काढली. कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपावा या उद्देशाने विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत शांतता राखण्याचे आवाहन केले.
शहरातील व्यापारी व सर्व सामान्य नागरिकांना विश्वासात घेत चुकीचे काम करणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण केला ती अवघ्या महिन्याभरात! तर त्याच वेळी यवत पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी स्विकारला. मात्र महिना होऊन ही अनेकांना यवत पोलीस ठाण्यात कोणता अधिकारी आले आहेत आणि त्यांचे नाव काय आहे हे माहिती नाही.
फक्त पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जाणारे व्यक्तींनाच नवीन कोणीतरी साहेब आले आहेत हे माहीत झाले. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेकांना पोलीस निरीक्षक देशमुख कोण आहेत, हे माहीत ही नाही. दाखल गुन्ह्यांची माहितीही माध्यमांना मिळत नाही. असो, कदाचित तीच त्यांच्या कामाची पद्धत असावी.
मात्र महिन्यातनंतर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा धंद्यावर कारवाईला सुरुवात केली. मंगळवारी (दि २७) यवत हददीत चौबेमळा येथे कॅनालचे कडेला बेकायदा गावठी हातभटटीची दारू गाळण्याची भट्टी चालू असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस हवालदार गुरू गायकवाड, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, मेघराज जगताप, पोलीस शिपाई मारूती बाराते आदींनी छापा टाकुन कारवाई केली.
नरेंद्र मस्ताराम पवार (वय २३ रा. वाखारी, ता.दौंड, जि.पुणे ) या व्यक्तीवर स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विषारी गावठी हातभट्टी दारू तयार करून तो विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दहा प्लॅस्टीकचे बॅरलमधील ५ हजार लिटर कच्चे रसायन त्यांमध्ये नवसागर बिबे, गुळ, झाडाची साली, भिजवलेली पोती, असे विषारी व मनुष्याचे जिवीतीस हानी होईल असे मिश्रण तसेच गावठी हातभटटीची दारू तयार करणेसाठी लागणाऱ्या १० किलोग्रॅम वजनाच्या १०० गुळाच्या ढेप, एक हिरो होंडा कंपनीची लाल रंगाची सी.डी.१०० एस.एस. मोटार सायकल, एक किर्लोस्कर कंपनीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार असा एकुण १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कारवाई केली. याप्रकरणी महाराष्ट्र दारु बंदी कायद्या अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











