विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
पुणे विभागातील पाच जिल्हे 311 स्थानिक व बहुराष्ट्रीय कंपन्या आणि तब्बल 43 हजार 613 जागांवर नोकरीची संधी हे वैशिष्ट्य आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर दोन व तीन मार्च रोजी होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याचे!
2 व 3 मार्च रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या 12 एकर मैदानावरती पुणे विभागाचा नमो महारोजगार मेळावा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन होत असून, हा मेळावा महायुती सरकार साठी देखील महत्त्वाचा असणार आहे.
आतापर्यंत या महारोजगार मेळाव्यासाठी तब्बल 14000 जणांनी ऑनलाईन लिंकद्वारे सहभागाची नोंदणी केली असून, प्रशासनाने ऑफलाइन नोंदणी देखील ठेवलेली आहे. त्यामुळे ज्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही, अशांना थेट या ठिकाणी भेट देऊन महारोजगार मेळाव्यात सहभाग घेता येणार आहे.
दोन मार्च रोजी सकाळी अकरा वाजता या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवारांच्या महायुतीतील सहभागानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत घेत आहेत.
आज या संदर्भात बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बारामतीत या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील विद्यार्थी, युवकांची व्यवस्था अगदी काटेकोरपणे होईल याकडे प्रशासन लक्ष देत असून यासाठी वेगवेगळ्या समित्या त्यांचे काम करत आहेत.











