दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : गेली अनेक वर्ष वाईच्या कडेगाव मध्ये किराणा दुकान व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराकडे अचानक एका चारचाकी वाहनातून एक महिला व पुरुष आले. तिघांमध्ये भांडण झाले आणि काही वेळातच या दुकानदाराने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर परिसरात खळबळ तर उडाली, पण काही क्षणातच ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी या परप्रांतीय दुकानदाराचा एकत्रित येऊन अंत्यविधी केला.
माणुसकीच्या संवेदनशीलतीचे एक वेगळे दर्शन या निमित्ताने इतरांना झाले. ही घटना अशी होती की, कडेगाव (ता.वाई) येथे भापी मातीलाल दास या ४० वर्षीय परप्रांतीय व्यक्तीचे किराणा दुकान आहे. अनेक वर्ष हे किराणा दुकान या परिसरात सुरू होते. भापी दास हा येथीलच शंकर देशमुख यांच्या घरात पत्नीसह गेली अनेक वर्ष भाड्याने राहत होता.
22 फेब्रुवारी रोजी सकाळच्या वेळी चार चाकी वाहनातून एक महिला व एक पुरुष आले आणि त्यांच्यासोबत भापी दास यांची बाचाबाची झाली. त्यानंतर काही वेळातच भापी दास यांनी राहत्या घरातील लोखंडी अॅंगलला नायलॉनच्या दोरीने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांना समजताच त्यांनी हवालदार मदन वरखडे, आर. व्ही.कोळेकर यांना घटना स्थळावर पाठवले. पोलिसांनी मृत दास यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करुन तो वाईच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचे जवळचे नातेवाईक कोणी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी कडेगाव ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेऊन तेथील स्मशानभूमीत अग्निसंस्कार केले. पुढील तपास हवलदार मदन वरखडे हे करीत आहेत.











