मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा उपक्रम!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने 60 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव वितरीत करण्यात येणार आहेत. यासाठी तपासणी व मोजमापे याचे शिबिर नुकतेच पार पडले.

इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हा उपक्रम पार पडला. या शिबीराचे उद्घाटन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैद्यकीय कक्षाच्या पुणे जिल्हा समन्वयक सीमा कल्याणकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबीराचे आयोजन करण्यात आले. ज्या दिव्यांग बांधवांना हात नाही किंवा पाय नाहीत, अशा दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात व पाय वितरण करण्यात येणार आहे.
दरम्यान शिवजयंती उत्सवानिमित्त इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथील निलोफर पठाण यांना शिवकन्या पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून सद्यस्थितीची, सुविधांची माहिती घेतली. लवकरच दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात, पाय तसेच कुबडी देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
वैद्यकीय कक्षाचे सागर आवटे, ॲड. आनंद केकाण, सोमनाथ लांडगे, वैद्यकीय मदत कक्षाचे सुरेश मिसाळ, राधिका जगताप, रुपाली रासकर, निर्मला जाधव, सतीश गावडे, मंगेश खताळ यांनी या शिबिराचे नियोजन केले.











