विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : निवडणूक आयोगाने काल पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. त्यानंतर आज आज उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार एकाच वेळी बारामती दौऱ्यावर आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेपासूनच बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर अजित पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार घेतला. त्यानंतर अजित पवार यांचा वृंदावन लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे व त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पणदरे शेतकरी मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे.
सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी साडे आठ वाजता शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांची बारामती मध्ये विविध ठिकाणी गाठीभेटी घेणार आहेत. दुसरीकडे आमदार रोहित पवार हे काटेवाडी येथे भेट देणार असून, शारदानगर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर कृषी विज्ञान केंद्र येथे शेतकरी संवादासाठी उपस्थित राहणार आहेत.
एकूणच काय, तर पवार कुटुंबामध्ये राजकीय फूट पडल्यानंतर व पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे व रोहित पवार हे एकाच दिवशी बारामती दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबाने बारामती मध्ये गाठीभेटी देण्यावर भर दिला आहे.











