बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आणि त्यापूर्वीच त्यांनी पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांचाच हक्क असल्याचे शिक्कमोर्तब केले. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामतीत होत्या. त्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल नार्वेकर यांना चिमटा काढला.
सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना यांनी निकालाचे अजिबात आश्चर्य वाटत नसल्याचे नमूद केले. त्या म्हणाल्या, गेल्या दोन वर्षातील परिस्थिती पाहिली तर फक्त कॉपी-पेस्ट सुरू आहे. जो निकाल शिवसेनेचा दिला, तोच निकाल राष्ट्रवादीचा दिला असून त्यामध्ये फक्त त्यांनी शिवसेनेचे नाव काढून, राष्ट्रवादीचे नाव टाकले. बाकी निकालात काहीही वेगळा फरक नाही. अर्थात राहुल नार्वेकर हे वकील आहेत. त्यांचंही अंतर्मन त्यांना सांगत असेल, परंतु महाशक्तीचा दबावच एवढा आहे, की ते बिचारे तरी काय करणार? अर्थात अत्यंत असंवैधानिक द्धतीने पक्ष ओरबाडण्याचे काम अदृश्य शक्ती करत आहे आणि त्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढू. आमचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल.
सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉंड संदर्भात केलेल्या टिप्पणीवर सुप्रिया सुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, आज सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉण्डसंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. या देशांमध्ये सर्वात मोठा घोटाळा हा इलेक्ट्रोल बॉण्ड आणि पेटीएम चा झालेला आहे. नोटाबंदी झाली. त्यानंतरच्या तपासण्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटा कशा सापडतात? सर्वात मोठा देशातील घोटाळा तर पेटीएम आणि इलेक्टोरल बॉण्डमध्ये झालेला आहे.
केंद्र सरकारने अतिशय चुकीचा निर्णय घेतला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिलेली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय घेतलेला आहे. सर्वात जास्त निधी इलेक्टोरल बॉण्डचा 5,600 कोटींचा भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार नक्की कोणी केला हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहित आहे. रिझर्व्ह बँकेचा आरोप आहे की, एटीएम मध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. एकीकडे नोटबंदी आणि दुसरीकडे पेटीएम हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा एकाच अकाउंट वरून झालेला आहे. 27 हजार कोटी रुपयांचा पेटीएम घोटाळा झालेला आहे. हे 27 हजार कोटी सामान्य लोकांचे आहेत असे त्यांनी सांगितले











