बारामती : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली परिसरात शाळेतून घरी चाललेल्या शाळकरी मुलीला पंजाब मधील गुरुदासपूर येथील आरोपीने पाठलाग करत विनयभंग केला व अपहरणाचा प्रयत्न केला. या खटल्यात बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पंजाब मधील जॉन स्टीफन रहिमत मासी याला दोन वर्षाची सक्तमजुरी व पाचशे रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेचा निकाल जिल्हा न्यायाधीश श्रीमती जे.पी. दरेकर यांनी दिला. यासंदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. ही घटना 18 ऑक्टोबर 2021 रोजी शेटफळ हवेली ते सुरवड या रस्त्यावर घडली होती. सरकारी वकील एडवोकेट प्रसन्न जोशी यांनी या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला.
या प्रकरणाची थोडक्यात हाकिकत अशी, शाळकरी पीडित मुलगी ही शाळेतून दुपारच्या वेळी घरी जात असताना जॉन स्टीफन हा पाठीमागून धावत आला आणि त्याने या पीडित मुली जवळ येऊन स्वतःसोबत नेण्याचा, अपहरणाचा प्रयत्न केला आणि जबरदस्तीने ओढून नेत पीडितेचा विनयभंग केला. त्याच वेळी सदर शाळकरी मुलगी मदतीसाठी आरडाओरडा करू लागल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघा जणांनी तिची सुटका केली आणि जॉन स्टीफन याला जागीच पकडले व पोलीस ठाण्यात आणले.
त्यावरून पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी श्रीमती जे.पी. दरेकर यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाचा व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जॉन स्टीफन रहिमत मासी याला अपहरणाच्या प्रयत्नाबद्दल दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी पक्षास सहायक फौजदार नामदेव नलावडे, पोलीस हवालदार अमोल खैरे व मयूर गायकवाड यांनी सहकार्य केले.











