आर्णी : महान्यूज लाईव्ह
घटना यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातील लोणी गावातील भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत केंद्रातील सरकारच्या योजना व राज्यातील सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी विशिष्ट गावं निवडून त्या ठिकाणी मुक्काम करत आहेत. त्या अंतर्गत माजी खासदार हंसराज अहिर हे लोणी गावात पोहोचले, मात्र त्यांना वेगळाच अनुभव आला.
माजी खासदार हंसराज अहिर हे लोणी गावात पोचल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी त्यांना शेतमालाचा हमीभाव, पिक विमा परतावा, सरकारच्या फसव्या योजना अशा अनेक मुद्द्यावर हंसराज अहिर यांच्यासमोर समस्यांचा पाऊस पाडला आणि घोडा मैदान लांब नाही असा इशारा देखील दिला.
याचवेळी या ग्रामस्थांनी त्यांना सबका विकास सबका साथ नसून, सबके साथ सबका भकास अशीच परिस्थिती असल्याचा टोला लगावला.
भाजपचे सध्या घर व गाव चलो अभियान सुरू आहे. या अंतर्गत मोदी सरकारच्या देशभरातील कामकाजाची पद्धत व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेत्यांना गावागावात जाण्याच्या सूचना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिल्या आहेत. भाजपच्या या योजनेतून सुरू असलेल्या या उपक्रमात मात्र शेतकऱ्यांकडून नेत्यांची चांगलीच कोंडी होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या योजनांचा जो रथ गावागावात फिरत होता, तोही अनेक गावातून लोकांनी पिटाळून लावल्याच्या घटना समोर असतानाच आता यात यवतमाळचीही भर पडली आहे. माजी खासदार हंसराज अहिर हे लोणी या गावात आले होते. शेतकऱ्यांनी समस्या सांगत अहिर यांना निरुत्तर केले.
सोयाबीन व कापूस या पिकांच्या झालेल्या नुकसानीत पिक विमा शेतकऱ्यांना कुठे एक रुपया तर कुठे दहा रुपये अशा प्रकारची भरपाई मिळालेली आहे. दुसरीकडे पंचनामे व्यवस्थित झालेले नाहीत. तिसरीकडे मिळणाऱ्या उत्पादनाचा खर्चही निघत नसून भाव पडलेले आहेत आणि इकडे मोदी सरकार मात्र नुसताच कामाचा ढोल वाजवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी अहिर यांच्यासमोर केला. अखेर रात्रीचा मुक्काम गावात करण्याऐवजी आहेर यांना माघारी परतवे लागले अशी चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.











