सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
गेल्या अनेक वर्षांपासून ज्या भरतीकडे डीएड, बीएड तसेच टीईटी झालेल्या उमेदवारांच्या नजरा लागून होत्या, त्या जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद शाळांच्या शिक्षकांची भरती आता जाहीर झाली आहे. राज्यातील पात्रता धारक उमेदवारांसाठी ही खुशखबर असून, पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार राज्यात 21 हजार 678 शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
या सर्व जागांमध्ये राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये यापैकी 12,522 पदे भरली जाणार असून नगरपरिषदेच्या शाळांमध्ये 1,123 महानगरपालिकेच्या 18 ठिकाणी शहरांमध्ये 2,951 शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
खाजगी अनुदानित शाळांनाही लॉटरी लागणार असून या ठिकाणी संस्थाचालकांना तब्बल 5,728 शिक्षकांची भरती करता येणार आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाखती न घेता 17000 जागा भरता येणार आहेत. म्हणजे पुन्हा एकदा तलाठी भरती सारखाच घोटाळा या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये पहिली ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दहा हजार 240 शिक्षकांची नियुक्ती केली जाणार असून अकरावी ते बारावी या उच्च माध्यमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 115 शिक्षक नववी ते दहावी साठी 2176 शिक्षक सहावी ते आठवीसाठी 8127 शिक्षक भरती होणार आहेत.











