हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिलवर सदस्यपदी निवड..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांची भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एन.सी.डी.सी.) जनरल कौन्सिलवर सदस्यपदी निवड झाली आहे. शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी दिल्याने इंदापूर च्या राजकारणात पुन्हा महत्त्वपूर्ण फेरबदल होणार आहेत.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तर पाटील यांच्या निवडीबाबत भारत सरकारच्या राजपत्रामध्ये अधिसूचना केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून भारत सरकारच्या अधिपत्याखाली देशभर पुण्यासह 18 विभागीय कार्यालयांमार्फत कामकाज केले जाते. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिलवर सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत सहकारी तत्वावर कृषी उत्पादने, अन्नपदार्थ, औद्योगिक वस्तू, पशुधन आणि उत्पादने यांच्यावर प्रक्रिया, विपणन, साठवणूक, निर्यात आणि आयात आणि निर्यात करणे तसेच रुग्णालय, आरोग्यसेवा आणि शिक्षणातील काही उत्पादने आणि सेवा यांचे यांचे नियोजन करणे आणि प्रोत्साहन देणे यासाठी काम केले जाते. तसेच देशातील विविध प्रकारच्या सहकारी संस्था, साखर उद्योग यांना सहाय्य करणे आणि त्यांच्या आर्थिक पायाचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय विकास महामंडळ (NCDC) केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे नेतृत्वाखाली काम करते.











