दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मांढरदेवीच्या यात्रेत कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोपर्डीच्या१२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बारा जणांनी एका हॉटेलमध्ये घुसून बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांढरदेवीची यात्रेचा हंगाम सुरू असतानाच रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास बोपर्डी येथील दहा ते बारा तरुण हातात लोखंडी सळई दगडी घेऊन हॉटेल स्वराजमध्ये घुसले व हॉटेल चालकाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील महिला व पुरुषांना अमानुषपणे मारहाण केली.
या घटनेत महिला पुरुषांसह आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना वाईच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी तातडीने फौजदार के .डी .पवार महिला हवालदार शितल साळुंखे, राहुल भोईर, विशाल येवले यांच्यासह घटनास्थळाची पाहणी केली व वाई तालुक्यातील बोपर्डी येथील संबंधित दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांचे एक पथक त्या तरुणांच्या टोळीचा शोध घेत असून मांढरच्या आई काळुबाईची यात्रा शांततेत सुरु असतानाच परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे.











