पुणे : महान्यूज लाईव्ह
मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्यासमवेत मराठा समाज पुण्यात तब्बल १० तास चालून आता मुंबईच्या वेशीवर धडकला आहे. लाखोंचे हे भगवे वादळ आज संध्याकाळी नवी मुंबईत पोचत असून वाशीच्या भाजी मार्केटमध्ये मुक्कामास असणार आहे.
मनोज जरांगे यांच्यासमवेत लाखोंच्या गर्दीने पुण्यातील रस्ते जाम करून टाकले. प्रत्येक क्षणी हे वादळ वाढतच असून आसपासच्या जिल्ह्यातील मराठा बांधव क्षणाक्षणाला या गर्दीत सामील होत आहे. दुतर्फा स्थानिक नागरिकांकडून होणारे स्वागत, वाटले जाणारे खाद्यपदार्थ व इतर साहित्य यामुळे पालखी सोहळ्यापेक्षाही कित्येक पटींनी मोठे स्वरुप या पदयात्रेला आले आहे.
आज दुपारपर्यंत मनोज जरांगे यांचा लोणावळा हा नियोजित मार्ग असून संध्याकाळपर्यंत हे वादळ नवी मुंबईत धडकेल. आज रात्रीचा मुक्काम हा वाशीच्या मार्केटमध्ये असून दरम्यानच्या काळात काल गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने जरांगे यांना नोटीस बजावण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.











