सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सरडेवाडीचे सरपंच सीताराम जानकर व ग्रामसेविका स्वाती लोंढे यांना अनुक्रमे आदर्श सरपंच व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू प्रतिष्ठान, जागृत शोध वृत्तपत्र व दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू पुरस्कार २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यातील ५० उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सन्मानासाठी आलेल्या पत्रात म्हटले आहे की,आपण केलेल्या उत्कृष्ट काम करणाऱ्या मधील एक आहात. आपण आपल्या देशासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी, तालुका व गावासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन आपली निवड करण्यात आलेली आहे. राजर्षी शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार २०२४ साठी आपण पात्र आहात, तसेच आम्ही घोषित करत आहोत. आपले कार्य खरोखरच दीपस्तंभा सारखे आहे, असे पत्र राजर्षी शाहू प्रतिष्ठानकडून जानकर व लोंढे यांना देण्यात आले आहे.
यावेळी बोलताना सरपंच जानकर म्हणाले की, ग्रामपंचायतीने सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावात अनेक विकासकामे केली आहेत, तसेच महिलांसाठी बचतगट चळवळ प्रभावीपणे गावात कार्यरत आहे. सर्व शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवत आहोत. या कामामध्ये ग्रामसेविका स्वाती लोंढे यांनी मोलाची मदत केली. महिला ग्रामसेविका असल्याने महिलांसाठी विविध उपक्रम राबवता आले, तसेच गावात महिला ग्रामसंघ स्थापन करण्यासाठीदेखील त्यांनी पुढाकार घेतला.











