बारामती : महान्यूज लाईव्ह
महावितरणच्या बारामती परिमंडळाने मागील पाच वर्षाची आकडेवारी सादर करत प्रत्येक वर्षी सरासरी एक लाख जणांना वीज जोड दिल्याचे जाहीर केले आहे एप्रिल 2019 ते डिसेंबर 2023 या पाच वर्षाच्या कालावधीत बारामती परिमंडळात पाच लाख 2 हजार 916 ठिकाणी वीज जोड दिले गेले आहेत.
नव्याने दिलेल्या वीज कनेक्शन मध्ये शेतीपंपाच्या एक लाख 9 हजार 72 विज जोडणी चा समावेश आहे. बारामती परिमंडलने पुणे जिल्ह्यातील बारामतीसह इंदापूर, दौंड, शिरूर, भोर, पुरंदर या तालुक्यांबरोबरच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात ही वीज जोडणी दिली आहे.
महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण ने एक दिवस एक गाव या मोहिमेबरोबरच मागील त्याला वीज कनेक्शन अशा मोहिमा राबवल्या आणि त्यातून हे यश मिळाल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.
अर्थातच या नवीन वीज जोडणी बरोबरच महावितरण ला महसुलामध्ये घसघशीत वाढ ही झाली आहे 31 मार्च 2019 अखेर परिमंडळामध्ये 24 लाख 89 हजार 942 एवढे वीज ग्राहक होते मात्र डिसेंबर 2023 अखेर ही संख्या 28 लाखांवर पोचली आहे.
वीज खांबापासून तुमची विहीर अथवा विंधन विहीर 90 फुटापर्यंत लांब असेल तर तात्काळ तुम्हाला वीज जोडणी दिली जाणार!
ज्या शेतकऱ्यांच्या विहीरीचे किंवा बोअरवेलचे अंतर महावितरणच्या अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून ३० मीटरच्या आत आहे, त्यांना २४ तासात कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. या अंतरातील प्रलंबित वीज जोडण्यांची संख्या शून्यावर आहे. नव्याने ज्यांना ३० मीटरच्या आतील जोडणी हवी असेल त्या शेतकऱ्यांनी स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.











