विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल होत आहेत, नवनवीन संशोधन होत आहे, या संशोधनाचा उपयोग शेतीसाठी योग्य परिस्थितीत झाला की शेती आणि शेतकऱ्यांचे नशीब बदलतं. गेल्या काही वर्षात बारामतीत कृषिक प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नव्या शेतीची नवीन दिशा समजून घेतली आणि कृषी प्रदर्शन राज्यभरातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरले असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
बारामती कृषी विज्ञान केंद्र आयोजित ‘कृषिक-२०२४’ कृषी प्रदर्शन उद्घाटन कर्नाटकचे कृषीमंत्री एन. चेलूवरायस्वामी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ सुनंदा पवार, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉ. अजित जावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, कृषी विकास प्रतिष्ठानच्या व कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली गेले काही वर्ष आपण हे कृषिक प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करतो. शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल होत आहेत. नवनवीन संशोधन होत आहे, या संशोधनाचा उपयोग शेती उत्पादनाच्या संदर्भात होत आहे. आणि ते तुम्हा लोकांपर्यंत पोहोचायला हवे, तोच खरा संशोधनाचा उपयोग आहे आणि म्हणून कृषिक सारखे कार्यक्रम हे संशोधकांनी केलेले काम पोहोचवण्यासाठी आणि तुम्हा लोकांना काय बदल होत आहेत.हे समजून घेण्यासाठी उपयुक्त आहेत.
पुढे बोलताना शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांची शेतीबाबतीतील एक आठवणही सांगितली,एकदा यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला की,या देशाचे शेतीचे प्रश्न काय आहेत आणि किती आहेत यावर त्यांनी उत्तर दिलं की,१० तोंडी रावण असतो तसे शेतीचे प्रश्न आहेत. तो एकच प्रश्न आहे असं नाही, पाण्याचा प्रश्न, जमिनीचा पोत कसा सांभाळायचा, कोणते बियाणे चांगले, कोणते नकली, गुंतवणूक केल्यानंतर त्याला मिळणारी किंमत ही योग्य आहे का,शेतीचा धंदा आज कसा होत आहे त्याबद्दलचे अनेक प्रश्न असतात आणि या प्रश्नांची सोडवणूक करणे हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्यासारखे आहे.यात ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची जबाबदारी अधिक आहे आणि म्हणून विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी अधिक असते,पण अलीकडे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदललेला आहे.
आज आपल्या देशामध्ये अनेक साखर कारखाने आहेत. आपल्या भागातील साखर कारखान्यांपासून आपण साखर तयार करतो, अल्कोहोल, इथेनॉल असे व आणखीन काही करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, पण त्याबरोबरच आपल्या कारखान्याजवळ मळी ही पडलेली असते आणि ती मळी निर्यात करता येते, परंतु काल केंद्र सरकारने सांगितलं की, मळी निर्यात करायची नाही; त्या मळीची किंमत मिळत असेल तर ती निर्यात केल्यानंतर मिळते, तर ती का नाही करायची ?
जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत ही ज्याच्या पद्धतीने मिळते, ती मिळत असताना त्याला जर कोणी आडवे जात असेल,तर तो खरा शेतकऱ्याचा हितकर्ता नाही आणि तसे चित्र आज देशांमध्ये दिसत आहे. थोडी जरी किंमत वाढली, तर लगेच सरकार त्या किमती कमी करण्याचा प्रयत्न करतात,पण शेतकऱ्याला त्याची किती किंमत मोजावी लागते याचा त्यांना अंदाज नाही.असेही शरद पवार म्हणाले.











