पिकवणारा हा जर कर्जबाजारी झाला,तो संकटात गेला तर खाणाऱ्यांना उपाशी राहावे लागेल!
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित कृषिक २०२४ याचे उद्धघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कर्नाटकचे कृषीमंत्री एन. चेलूवरायस्वामी, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, ऑक्सफर्ड विद्यापीठचे डॉ. अजित जावकर, ॲग्री पायलट ची डायरेक्टर संचालक डॉ. प्रशांत मिश्रा, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, दिल्लीमध्ये कधी-कधी पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारच्या माणसांबरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न हा मी उपस्थित केल्यानंतर मला बोलतात, काहीही सांगतात, तुम्ही पिकवणारे आम्ही खाणारे असं सांगून मूळ प्रश्न बाजूला करतात. अर्थात या देशात पिकवणारे किती आणि खाणारे किती, याचा जर अंदाज घेतला,तर पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि मी सांगत होतो की, पिकवणारा जर कर्जबाजारी झाला, तो संकटात गेला तर खाणाऱ्यांना उपाशी राहावे लागेल.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, शेतीवरचा बोजा हा वाढलेला आहे. मी नेहमी सांगत असतो की,हा वाढलेला बोजा आपल्याला कमी करायला हवा, देश स्वतंत्र झाला, तेव्हा ३५ कोटी लोकसंख्या होती, तेव्हा ८०% लोक हे शेतीवर अवलंबून होते. आज ५६% लोक शेतीवर अवलंबून आहेत, परंतु तितकी जागा राहिलेली नाही. एमआयडीसी, रस्ते हायवे, धरणे, नवी मुंबई सारखे शहर यांसारख्या अनेक योजनांमुळे शेतीची जमीन नाहीशी झाली.
तरीही शेतीवर जवळपास आज ३० पट लोक अवलंबून आहेत. त्यामुळे शेतीच्या संदर्भात वेगळा दृष्टिकोन केला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका मुलाला तरी कुठे ना कुठेतरी नोकरी मिळावी याची खबरदारी घेतली पाहिजे, तरच शेती ही फायद्याची होईल आणि शेती फायद्याची होण्यासाठी जशी धोरणे महत्त्वाची आहेत, तसेच संशोधन, नवीन घेतलेला शोध तो शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचवणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
कृषिक सारखी प्रदर्शने यासाठी महत्त्वाची आहेत. तुम्ही पुढच्या ४-५ दिवसांमध्ये जे पाहाल, जे काही नवीन बदल होत आहेत, ते जाणून घ्याल आणि ते तुमच्या शेतीमध्ये आणून तुमची सापत्तीक शेती ही सुधारण्यासाठी काम कराल अशाच प्रकारची अपेक्षा आहे. मला आठवतंय, त्या काळामध्ये मी मंत्री होतो आणि माझ्याकडे अन्न पुरवठा खाते होतं आणि त्या वेळेला दुष्काळ पडला, धान्य परदेशातून आले आणि ते धान्य ज्वारीच्या ठिकाणी मिलो होतं आणि त्या मिलोची लाल भाकरी मला माहिती नाही, तुमच्यापैकी कोणी पाहिली का? ती भाकरी खायचा प्रसंग केवळ उत्पन्न घटलं आणि दुष्काळ पडला म्हणून या देशांमध्ये आलेला होता आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर, शेतकऱ्याचे उत्पादन, त्याची उत्पादन क्षमता,त्याच्या उत्पादनाची किंमत यावर भर द्यावा लागेल.
एक आंदोलन झाले. मी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडे गेलो होतो, कांद्याच्या किमती ढासळल्या, त्याचा उत्पादन खर्च देखील निघत नव्हता; फक्त परदेशात कांदा पाठवला, तर किंमत मिळत होती, पण केंद्र सरकारने परदेशामध्ये कांदा पाठवायला ४०% ड्युटी बसवली. मी शेती खात्याचा केंद्रात मंत्री होतो, कांद्याच्या किमती वाढल्या होत्या; पार्लमेंटचे हाऊस सुरू झाले आणि विरोधी पक्षाचे, भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून पार्लमेंटमध्ये आले आणि घोषणा सुरू केल्या की, शरद पवार इस्तीफ़ा दो । स्पीकरने विचारलं काय आहे ? कशासाठी या घोषणाबाजी चालू आहेत? तर विरोधकांनी सांगितलं की, कांद्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्याला जबाबदार कृषिमंत्री आहे आणि म्हणून त्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत.
मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खुलासा करा,मी त्यांना सांगितलं की, रोजच्या खाण्यामध्ये तुमचा कांद्याचा खर्च किती आहे? तांदूळ, डाळी, ज्वारी, तेल, तिखट या सर्वांचा खर्च असेल,परंतु यात कांद्याचा किती खर्च आहे? एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही,तर माणूस उपाशी राहिला असे होत नाही. पण हा कांदा उत्पादक शेतकरी गरीब आहे आणि या गरीब शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळत असतील, तर लगेचच किमती थांबवण्यासाठी बंदी घाला ही मागणी मला मंजूर नाही. तुम्ही कांद्याच्या माळा घाला, नाहीतर काहीही करा, मी कांद्याची किंमत खाली येऊ देणार नाही, मी त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे त्यासाठी काहीही सहन करायला तयार आहे, शेवटी सर्वजण गप्प बसले आणि त्यांनी मान्य केले.











