राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : अखेर दौंड वन विभागाकडून तालुक्यातील पूर्व भागातील मलठण, राजेगाव, वाटलूज, नायगाव परिसरातील वन विभागाच्या हद्दीतील बेकायदा वृक्षतोड व कोळसा भट्ट्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वनविभागाने बेकायदा वृक्षतोड केलेली लाकडे मोठ्या प्रमाणावर जप्त करून या ठिकाणच्या पाच ते सहा कोळसा भट्ट्या उद्ध्वस्त करून नष्ट केल्या आहेत.
ही माहिती दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी दिली. दरम्यान, बेकायदा वृक्षतोड थांबून कोळसा भट्ट्यांवर कारवाईला सुरुवात केल्याने संबधित कोळसा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईच्या भीतीने वृक्षतोड करणारे कामगार रात्रीत पसार झाले आहेत. राजकीय वरदहस्ताने मागील काही दिवसांपासून भीमा नदीच्या काठालगत असलेल्या वन क्षेत्र आणि उजनीसाठी संपादन केलेल्या क्षेत्रात वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदा कत्तल सुरू होती.
एकट्या मलठण हद्दीतील तब्बल पाच एकर क्षेत्रातील वृक्षांची बेकायदा कत्तल केली होती. तसेच वाटलुज, नायगाव, राजेगाव या हद्दीतील वनक्षेत्रात ठिकठिकाणी वृक्षतोडीचा सपाटा सुरू होता. या वृक्षतोडीसाठी या वनक्षेत्रात ठिकठिकाणी सुमारे तीनशे ते चारशे मजूर कामाला लावले होते. वृक्षतोड केलेली झाडे जाळून त्याचा कोळसा बनवला जातो. वन विभागाच्या हद्दीतच ठिकठिकाणी बेकायदा कोळसा भट्ट्या ही सुरू होत्या. तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे स्थानिक राजकीय बगलबच्चांनी वन विभागाचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या बेकायदा कोळसा खाणी सुरू करून हा धंदा तेजीत सुरू ठेवला होता.
यामध्ये या परिसरातील एका गावचे गाव कारभारी मुख्य ठेकेदार असल्याची चर्चा या परिसरात आहे. मात्र मलठण ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी या संदर्भात वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती. या संदर्भात महान्यूजने सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून वन विभागाचा भोंगळ कारभार उघड केला होता. मात्र अखेर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेतल्याने त्यांनी तालुका वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार वनपाल रवी मगर, वनरक्षक भाऊ जाधव, बापू झडगे ,निखिल गुंड , किरण कदम आदी वन अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि १७) मलठण, राजेगाव, वाटलुज, नायगाव या भागातील वन विभागाच्या क्षेत्रातील बेकायदा वृक्षतोड केलेली झाडांची लाकडे जप्त करुन ती ट्रॅक्टर मध्ये भरून ताब्यात घेतली. तसेच या ठिकाणी असलेल्या पाच ते सहा कोळसा खाणी जाळून उध्वस्त करीत त्या जागीच नष्ट करून कारवाई केली.
वन क्षेत्रातील बेकायदा वृक्षतोड केलेली लाकडे जप्त करण्याचे काम सुरू असून संबंधित वृक्षतोड करणाऱ्यांवर तसेच कोळसा खाणी मालक व चालक यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत वन विभागाने दिले आहेत. दरम्यान, दौंडच्या पूर्व भागात वन क्षेत्रातील बेकायदा वृक्षतोड आणि कोळसा खाणीवर वन विभागाने कारवाईला सुरुवात केली असली तरी ही यामध्ये बड्या राजकीय नेत्यांची स्थानिक बगलबच्चांचे हात गुंतले आहेत.
त्यांच्यावर कारवाई होऊ नये, गुन्हे दाखल होऊ नये यासाठी तालुका पातळीवरील वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. मात्र वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला न जमता संबंधित कोळसा खाणी चालक व मालक व बेसुमार वृक्षतोड करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करून ठोस कारवाई करावी अशी शेतकरी व ग्रामस्थांची अपेक्षा आहे.











