इंदापूर – महान्यूज लाईव्ह
मुंबईत किंवा नियोजन मंडळात एखादी गोष्ट विचारात घेईपर्यंत इंदापूर तालुक्यात आजी माजी आमदारांकडून प्रसिध्दीमाध्यमांना लगेच बातमी पोचवली जाते. आपणच केले.. आपणच केले.. दोघांचीही माहिती सारखीच.. लोकही संभ्रमात असतात… चला या निमित्ताने स्पर्धा होतेय, पण राजकीय श्रेयवादात एकमेकांवर जहरी टिका करणारी नेतेमंडळी तालु्क्यातील सर्वांच्या जिव्हाळ्याच्या दुष्काळावर मात्र अजूनही का बोलत नाहीत?
शेजारच्या बारामती तालुक्यात संपूर्ण दुष्काळ जाहीर झालाय, तशीच स्थिती इंदापूर तालुक्यातही आहे. मात्र तालुक्यात दुष्काळी तालुक्यांना ज्या सुविधा दिल्या जात आहेत, त्या सुविधा इंदापूर तालुक्यातही असायला हव्यात यासाठी मात्र कोणीच लक्ष द्यायला तयार नाही, हे म्हणायचे कारण इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे भगवान खारतोडे या युवा शेतकऱ्याने आपल्या बैलांसह उपोषण सुरू केले आहे, तिकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही.
अर्थात फक्त नेतेमंडळीच नाही, तर तालु्क्यातील प्रत्येक नागरिकाचीही हेच अपयश आहे, कारण तोच शेतकरी कोणत्यातरी जातीचा, धर्माचा मुद्दा घेऊन किंवा भावनिक मुद्दा घेऊन उपोषणाला बसला असता, तर त्याच्यापुढे रांग लागली असती. मग कोणी गावबंद केले असते, तर कोणी रॅली काढल्या असत्या.
इंदापूर तालुक्यात खारतोडे हे पाच दिवस उपोषणाला बसलेत.. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नाही.. ना राजकीय नेते भेटले, ना नागरीक.. अजूनही गावोगावचे लोकांचे जथ्थेच्या जथ्थे त्याला भेटायला आलेच नाहीत. मग आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या, एकूणात सर्वांच्या तळमळीच्या प्रश्नावर पोटतिडीक दाखविणाऱ्याबाबत तुम्हाला आस्था नसेल, तर मग नेतेही तुम्हाला कोनशीलेकडेच नेतील.. तुम्हाला एकमेकांना कशा शिव्या घातल्यात, यातच तुमचे मन गुंतवतील.
बाकी दबावगट करण्याचा, ज्याचा, त्याचा प्रश्न..! जोपर्यंत दुष्काळ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा गंभीर प्रश्न वाटत नाही, तोपर्यंत कोणाच्याही उपोषणाला अशाच मरणकळा येतील. जोपर्यंत एखादा मोठा नेता उपोषणाला बसत नाही, तोवर त्या प्रश्नालाही तशीच सुतकी कळा राहील.. कारण साहजिकच आहे. भगवान खारतोडे दररोज कोणाला खायला घालू शकत नाही आणि प्रसिध्दीचे मोठे तंत्र त्याच्याकडे नाहीच नाही..!











