बारामती : महान्यूज लाईव्ह
ज्योतीचंद भाईचंद सराफ या संपूर्ण राज्यभर व देशात प्रसिद्ध असलेल्या सराफी पेढीचे प्रमुख व बारामतीतील प्रसिद्ध सराफ शांतीकुमार जंबुकुमार शहा- सराफ यांचे आज वयाच्या 80 व्या वर्षी पुणे येथे उपचार दरम्यान निधन झाले.
शांतीकुमार सराफ उर्फ शांतीशेठ हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे देखील संचालक होते. बारामती सराफ असोसिएशनचे ते मार्गदर्शक होते. उत्तम व्यापार व उत्तम शेती याचे सूत्र सांभाळताना शांतीकुमार सराफ यांनी बारामती आणि परिसरात संपूर्ण राज्यभर मित्रपरिवार निर्माण केला होता. बारामतीतील अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे ते काही काळ अध्यक्षही होते.
त्यांनी बारामतीचे उपनगराध्यक्ष म्हणून देखील काही काळ काम पाहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.











