बघा, लातूर, नांदेड, धुळ्यासह महाराष्ट्रात सरकारच्या डोळ्यात दुधाला ३४ रुपयांचा दर! प्रत्यक्षात किती दर आहे, तुम्हीच पहा.. दुध उत्पादकांचा एवढाही तळतळाट घेऊ नका राव..!
इंदापूर – महान्यूज लाईव्ह
सध्या दूध उत्पादकांएवढा अन्याय कोणावरच होत नसेल.. राज्य सरकारने दूध उत्पादकांसाठी ५ रुपये अनुदानाची घोषणा होताच व त्यात खासगी दुध संस्थांचाही समावेश होताच आता पुन्हा दूधाचे दर ५ रुपयांनी घटवले आहेत. मात्र सरकारच्या कागदावर दुध डेअऱ्यांनी असा पोतेरा फिरवला आहे की, सरकारला दुधाचे दर प्रत्यक्षात २९ ते ३५ रुपये असल्याचाच भास होऊ लागला आहे.
शेतकरी संघटनेच्या इंदापूर तालुक्यातील नेत्याने माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्यात तर सर्व दुध संघ अतिशय प्रामाणिकपणे कसे किमान २९ ते कमाल ३५ रुपये प्रतिलिटर दूधाचा दर देतात याची माहितीच त्यांना त्या त्या जिल्हा दुधव्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील हरिदास पवार यांनी नाशिक जिल्ह्यात माहिती मागवली, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२३ या काळात सिन्नर तालुका संघ, साईगिरणा मालेगाव तसेच वडांगळीच्या महालक्ष्मी दूध डेअरीने २९ रुपये, अंबडच्या अतुल डेअरीने ३६ व ३० रुपये, सोनांबेंच्या समृध्दी डेअरीने ३२ व २८ रुपये अनुक्रमे तर करंजवनच्या वसुंधरा डेअरीने चक्क ३५ रुपये ६० पैसे प्रतिलिटर दुधाला दर दिल्याचे जिल्हा दुधव्यवसाय विकास अधिकाऱ्या्ंनी लेखी दिले आहे.
धुळे जिल्ह्यातील दुधाचे दर पहा..
धुळे तालुका दूध संघाने गायीसाठी ३४ रुपये तर म्हशीच्या दुधाला ४९ रुपये तर शिरपूर दुध संघाने गायीच्या दुधाला ३४ रुपये, शिंदखेडा तालुका दूध संघाने गायीसाठी ३४ रुपये तर म्हशीच्या दुधाला ४८.५० रुपये प्रतिलिटर दर दिला आहे. धुळे व नंदूरबारच्या बलसाड संघाने गायीच्या दुधाला तर चक्क ३६ रुपये ५५ पैसे, तर म्हशीला ५१.३० रुपये प्रतिलिटर दर दिला.
आर्वीच्या प्रयाग डेअरी, साक्रीच्या छाईल येथील सिस्टी डेअरी, शिंदखेडाच्या मालपूर येथील धवल डेअरी व रेवती डेअरीने गायीच्या व म्हशीच्या दुधाला अनुक्रमे ३५ ते ४९ रुपयांपर्यंत दर दिल्याचे नमूद केले आहे. ही लेखी माहिती धुळे व नंदूरबारच्या जिल्हा दुध विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लातूर जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही, येथील जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्यांनीही अशाच प्रकारची लेखी माहिती दिली आहे. लातूर जिल्ह्याबाबत बोलायचे झाले तर लातूर जिल्हा संघाने ऑक्टोबर २०२३ मध्ये ३३ रुपये प्रतिलिटर दर दिला, तर महानंद डेअरीने ३४.७८ रुपये दर दिला.
उदगीर तालुक्यात हा दर ३२.५० रुपये, हेरिटेजचा दर ३४ रुपये, निलंगा, अहमदपूर येथील जर्सी डेअरीचा ३२ रुपये तर उजना मिल्कचा ३४ रुपये, एमआयडीसी लातूर येथील मदर डेअरीचा दर ३४ रुपये, नंदिनीचा दर ३० रुपये प्रतिलिटर अशा प्रकारे माहिती दिली आहे.
अर्थात माहिती डिसेंबर महिन्यापर्यंतची मागवल्यानंतर ऑक्टोबरचा दर देणाऱ्या या जिल्ह्याचा साबण तसा स्लोच आहे असे म्हणावे लागेल किंवा डिसेंबर महिन्याचा दर अंगलट येऊ नये म्हणूनही ही आखणी असण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्याची आकडेवारी अशी की, या जिल्ह्यात सर्वांनी ३४ रुपये प्रतिलिटर दर दिलेला आहे. म्हणजे सांगायचे झाल्यास नांदेडच्या मदर डेअरीने ३४ रुपये, उमरखेडच्या अमूल डेअरीने ३४ रुपये, हेरिटेज डेअरी जानापूरी, सिंधीची साईकृपा डेअरी, लोहा येथील नमस्कार डेअरी, मुखेड येथील विजापूरी डेअरी या सर्वांनीच ३४ रुपये दर दिल्याचे लेखी कळविण्यात आले आहे.
एकूणच एकंदरीत प्रत्यक्षात दुध उत्पादकांचे भाव पडले असले तरी सरकारच्या लेखी मात्र आनंदीआनंदच आहे. डेअऱ्यांनी जसे भाव जिल्ह्याच्या दुग्धअधिकाऱ्याला सांगितले, तसेच दु्ग्धविकास अधिकाऱ्याने कळवले आहेत. या जिल्ह्यांच्या दुग्ध खात्यातील एकाही अधिकाऱ्यास वस्तुस्थितीची माहिती घेण्याची तसदी घ्यावी असे वाटले नाही, यातच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या या खात्यातील कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांप्रती आस्था कळून येते.
दुध खरेदी २७ रुपयांनी, मग विक्रीत का घट केली नाही?
दरम्यान शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पांडूरंग रायते यांनी एक मोठा व गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. जर दुधाच्या दरात कपात करण्याची वेळ दुध प्रकल्पांवर आली असेल व त्यांनी शेतकऱ्यांकडील दुध खरेदीचे दर कमी केले असतील, तर त्याच प्रमाणात त्यांनी विक्रीच्याही दरात कपात करायला हवी होती. दुध खरेदी करताना २७ रुपये प्रतिलिटर दराने केले व विक्री मात्र ५४ रुपयेच ठेवली. दुध प्रकल्पांनी ही खाबूगिरी कोणाच्या जिवावर केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.











