राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड प्रांत कार्यालयाची कोनशीला राज्यभर चर्चेत आली आणि सगळीकडचं राजकीय वातावरण तापलं! अर्थात अजून काहीच बिघडत नाही, म्हणून अधिकारी गप्प बसले होते; पण प्रकरण वाढत असल्याचे पाहताच, अखेर कोनशिलेवर अजितदादांचे नाव टाकून मोकळे झाले! पण प्रकरण इथेच संपलं नाही, अजितदादांच्या नावाची कोनशीला तर उभारली गेली, पण प्रांताधिकारी आणि तहसीलदार मात्र रजेवर गेले आहेत.
कोनशिलेवर महसूल आणि बांधकाम विभाग प्रशासनाने सोमवारी रात्री उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचे नामोउल्लेख असलेली दुसरी कोनशिला उद्घाटन केलेल्या कोनशीला शेजारी बसवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शिष्टाचाराचा भाग मानली गेलेली व कर्तव्याचे बंधन असलेली महसूल आणि बांधकाम विभागाची यंत्रणा मात्र उघडी पडली. प्रशासनाचा कामकाजाचा भोंगळ कारभार अखेर उघड झाला आहे.
अधिकाऱ्यांच्या या कामकाजावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसरी कोनशीला लावून प्रशासनाने आपण चूक केली हे अखेर मान्य केले आहे. मात्र त्यानंतर दौंड प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला व तहसीलदार अरुण शेलार हे रजेवर गेले आहेत. त्यांच्या अचानक रजेवर जाण्यामुळे दौंड तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
१० डिसेंबर रोजी दौंड नवीन प्रांत कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. याची कोनशिला उभारण्यात आली होती. तसेच यावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल , आमदार जयकुमार गोरे यांची नावे कोरलेली होती. या उद्घाटनाच्या कोनशिलेवरून मागील काही दिवसांपासून दौंड तालुक्यात राजकारण तापले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा या कोनशिलावर नामोल्लेख केला नसल्याने त्यांनी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांना याबाबत लेखी पत्र देऊन याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली होती. या पत्राचे उत्तर घेण्यासाठी वैशाली नागवडे या प्रांत कार्यालयात गेल्या होत्या.
मात्र प्रांताधिकाऱ्यांनी अपेक्षित उत्तर न देता उलटसुलट उत्तर दिल्याने अखेर वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे, दौंड शुगरचे संचालक विरधवल जगदाळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली.
रात्रभर त्यांनी त्या कार्यालयात आंदोलन केले.या आंदोलनामुळे प्रशासना खडबडून जागे झाले. या आंदोलनानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांवर टीका केली. याला उत्तर म्हणून राष्ट्रवादीने प्रत्युत्तराची पत्रकार परिषद घेतली यामध्ये भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला आंदोलकावर अश्लिल भाषेत टीका केली असा आरोप आंदोलकांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
पालकमंत्री अजित पवार यांचा नामोउल्लेख राजकीय दबावामुळे जाणून बुजून टाळण्यात आला. या सर्व प्रकारामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला होता. आमचे आंदोलन हे प्रशासनाच्या विरोधात असताना भाजपने पत्रकार परिषद घेऊन ते आम्हीच केले असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. असा आरोप तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे यांनी पत्रकार परिषद केला होता.
कोनशिलेच्या नामोउल्लेखामुळे राज्यात सत्तेत असलेल्या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षात श्रेयवादावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन ते एकमेकांची बाजू पोटतिडकीने मांडत होते. कोनशिलावरून तापलेल्या राजकारणामुळे प्रशासकीय अधिकारी मात्र अडचणीत आले.
अखेर प्रशासनाने उद्घाटन केलेल्या कोनशीला शेजारीच सोमवारी ( दि ८) रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसरी कोनशिला बसवली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख करण्यात आला. त्याचबरोबर बारामती विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचाही नामोल्लेख या कोनशिलावर करण्यात आला.











