कराड : महान्यूज लाईव्ह
चांदीच्या व्यवसायात चांदीच असते, असं सांगत कराडच्या व्यवसायिकाला भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील भिकवडी गावच्या दोन भावांनी तब्बल 90 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड येथील व्यावसायिक सुरज विष्णू साळुंखे यांची तब्बल 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड शहरात फिर्याद आली होती. सुरज साळुंखे हे चांदीचा व्यवसाय करतात. व्यवसायाच्या निमित्ताने आंध्र प्रदेशातील सेलम तसेच इतर ठिकाणी चांदीचे जे हब आहेत, अशा ठिकाणी ते चांदी खरेदीसाठी जातात. या ठिकाणी त्यांची ओळख भिकवडी गावच्या नवीन सावंत याच्याशी झाली.
यावेळी नवीन सावंत याने सुरज साळुंखे यांच्याशी गोड गोड बोलून कराडमध्ये आपण नव्याने व्यवसाय सुरू करणार असून भागीदारीत व्यवसाय करू अशी कल्पना मांडली. सुरज साळुंखे यांनी त्यास होकार दिला आणि साधारणपणे सुरुवातीला प्रत्येकाचे 30 लाख रुपये या व्यवसायात गुंतवू असे ठरवले.
नवीन याने या संदर्भात त्याचा भाऊ महेश याच्याशी सुरज साळुंखे यांचे बोलणे करून दिले. 16 जानेवारी 2022 रोजी सुरेश साळुंखे यांनी नवीन सावंत त्याला तीस लाख रुपये दिले. मात्र व्यवसाय पुढे चालू झालाच नाही. त्यानंतर ऑगस्टमध्ये सुरज साळुंखे यांच्या दुकानात महेश व नवीन यांनी येऊन आणखी दहा लाख रुपयांची गरज आहे आणि चांदी जास्त आणायची असेल तर तीस लाख रुपये आणखी लागतील अशा स्वरूपाची मागणी केली.
सुरज यांनी मित्रांकडून तीस लाख रुपये उसने घेऊन व आणखी दहा लाख रुपये या दोघांना दिले. मात्र भागीदारीचा व्यवसाय सुरू झालाच नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने सुरज साळुंखे यांनी पोलिसांकडे धाव घेतली.











