बारामती: महान्यूज लाईव्ह
ईडी च नाव ऐकलं की भल्याभल्यांचा थरकाप उडतो, अर्थात हा थरकाप मागील दोन वर्षापर्यंत उडायचा. आता मात्र त्याची टर उडवली जाते, ईडीचे शस्त्र म्हणजे फक्त विरोधकांवरच हे जणू सूत्रच बनले आहे. अथवा स्वपक्षातल्या नाकापेक्षा मोती जड होऊ लागलेल्या नेत्यांवरच ईडीकडून अडचणी आणून त्यांना शरणागत परिस्थितीपर्यंत आणायचे हे धोरण असल्याचे गणित लोकांच्या चर्चेतून पुढे येताना दिसते.
अर्थात आता लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी ते अगदी महाराष्ट्रातील आक्रमक विरोधी पक्षाचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागलेल्या रोहित पवारांपर्यंत अनेक जणांवर ईडीचा फास आवळण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
देशातील विविध राजकीय पक्षांचे नेते ईडीच्या कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत.
अजूनही काही नेते निशाण्यावर आहेत. तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर ईडी कडून धाडसत्र सुरू आहे. दुसरीकडे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या संभाव्य अटकेसंदर्भातही अनेक चर्चा सुरू आहेत आणि काल महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपर्यंत सुरू असलेला महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचा तथाकथित घोटाळा, आता इतर नेत्यांकडून ज्यांनी या बँकेकडून कर्ज घेतली अशा कर्जदारांपर्यंत आणून ईडीने ठेवला आहे.
दरम्यान ईडीने बारामती ॲग्रो च्या विविध कार्यालयावर छापेमारी केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही संघर्षाची तयारी ठेवल्याचे दमदार संकेत दिले आहेत. कालच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील रोहित सर्वांना पूर्ण उरेल अशा स्वरूपाचे वक्तव्य केले आणि त्यानंतर काही वेळातच रोहित पवार यांचे ट्विट झळकले. अगदी काही मिनिटातच हे ट्विट पन्नास हजार जणांनी पाहिले.
रोहित पवार यांनी ‘एक्स’ अकाउंटवर सूचक असं ट्वीट केलं आहे. “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल,” असं रोहित पवारांनी यामध्ये नमूद केले आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीतून रोहित पवार हे आक्रमकपणे भाजपच्या विरोधात सातत्याने बोलत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्याविरुद्धही कारवाई करण्याची सरकारची योजना असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर युवा संघर्ष यात्रा पूर्ण होताच आता केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा रोहित पवारांच्या मागे लागल्याचे दिसत आहेत.











