दौंड : महान्यूज लाईव्ह
पाटस – बारामती या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर दुचाकीवरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक गंभीर मार लागल्याने जखमी झाला आहे.
गोरक्षनाथ भीमराव भंडलकर (वय (१६) याचा या घटनेत मृत्यू झाला. ऋषिकेश रमेश भंडलकर ( वय १६, दोघेही रा. हिंगणीगाडा ता. दौंड जि पुणे) हा गंभीर जखमी झाला. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या आसपास बोबडे यांच्या खडी क्रेशर समोर हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, गोरक्षनाथ आणि ऋषीकेश हे इयत्ता दहावी मध्ये शिकत असुन ते वासुंदे येथील श्री श्रीगुरुकृपा माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. ६) सकाळची शाळा असल्याने दुचाकीवरुन शाळेत जात होते.
यावेळी भरधाव वेगाने पाठीमागून आलेल्या रायडिंग करणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात या दोघांना गंभीर मार लागल्याने जखमी झाले. गोरक्षनाथ भंडलकर यास बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले, तर ऋषिकेश हा गंभीर जखमी झाल्याने त्यास पाटस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर संतप्त पालकांनी व ग्रामस्थांनी पाटस – बारामती महामार्ग अडवून रास्ता रोको केला, घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, समीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांची समजुत काढली. या अपघातातील रायडिंग दुचाकी चालक ही जखमी झाला आहे. याबाबत पाटस पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.











