सातारा : महान्यूज लाईव्ह
थंडीच्या दिवसांमध्ये चार हजार किलोमीटर स्थलांतर करून अरेबिया व जॉर्डन येथून भारतात व पश्चिम महाराष्ट्रात पांढूरका शिंगळा घुबड (Pallid Scops-Owl, Otus brucei) येतात. सातारा भागात हे दुर्मिळ घुबड पहिल्यांदा दिसल्याचे वन्यजीव अभ्यासक गणेश धुमाळ यांनी सांगितले.
हे घुबड थंडीच्या दिवसांमध्ये चार हजार किलोमीटर स्थलांतर करून येते. अरेबिया व जॉर्डन येथून पांढूरक्या शिंगळा घुबडाचे स्थलांतर होते. सध्या हे घुबड महाराष्ट्रात आले असून एकत्र काही ठिकाणी दिसून येतात. तसेच खुरट्या झाडांवर जमिनीपासून दोन ते पाच फूट अंतरावर बसलेले दिसून येतात.
या घुबडांचा मुख्य आहार छोटे कीटक, सरडे , पाली व उंदीर असा आहे. वन्यजीव अभ्यासानुसार जॉर्डनमध्ये यांची 400 घरटी आढळून आली होती. यांची घरटी साधारणपणे सुतारपक्षासारखी झाडाला छिद्रे पाडून बनवलेली असतात. त्यामध्ये हे तीन अंडी देऊन 21 दिवसापर्यंत उबवण करून, पुढे तीस दिवस पिल्लांना सांभाळतात.
जॉर्डन, अरेबिया सारख्या भागांमध्ये या दिवसांमध्ये प्रचंड थंडी पडते. त्यामुळे हे पक्षी प्रजननासाठी उष्ण कटिबंधीय भागात स्थलांतर करत असावेत असा कयास आहे. हा दुर्मिळ पक्षी सातारा भागात नुकताच आढळून आला.











