शिरूर : महान्यूज लाईव्ह
रांजणगाव एमआयडीसी मधील बटाटा चिप्स बनविणाऱ्या कंपनीचे साहित्य चोरणाऱ्या चार आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक करत चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगाव एमआयडीसी येथील पेप्सिको कंपनीत चिप्स बनविणाऱ्या कंपनीचे सुमारे ११ लाख २० हजार ९८० रुपये किमतीचे साहित्य चोरी गेले होते.याबाबत रांजणगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याचा तपास रांजणगाव पोलिसांनी सुरू केला होता. रांजणगाव पोलिसांनी तपास करत असताना ३० ते ४० ठिकाणी सीसीटिव्ही आधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. गोपनीय माहितीच्या आधारे विजय पांडुरंग पाटील (रा.जळगाव),भूषण संतोष मिस्त्री (रा. निंभोरा, बुरहानपुर,मध्यप्रदेश), मुकेश पिरमु ध्रुवे (रा.मध्यप्रदेश) या आरोपींना ताब्यात घेतले.
कसून चौकशी केली असता,आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेले साहित्य हे सुनील मांगीलाल महाजन (रा.कारेगाव) यास विकले असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून चोरीचे साहित्य जप्त केले आहे. हा तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, माणिक काळकुटे यांनी केला.











