खुद्द मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुंबई : कार्पोरेट क्षेत्राप्रमाणे व केंद्राप्रमाणे सरकारी कार्यालयांमध्ये देखील आठवडा पाच दिवसांचा करण्यावर राज्य सरकार गांभिर्याने विचार करीत आहे. आज मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याचे संकेत दिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृहात आज राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या महासंघाच्या शिष्टमंडळासमवेत ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अप्पर मुख्य सचिव सिताराम कुंटे, अर्थ विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव नितीन गद्रे आदींसह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी तपासून तातडीने प्रस्ताव पाठवावा अशी सूचना केली. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्यावर शासन विचार करीत असून अत्यावश्यक सेवा वगळून हा आठवडा करण्यावर शासनाचा भर राहील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.










