खाकी वर्दीचं स्वप्न उतरलं सत्यात, मिळवले फौजदार पदाचे स्टार. जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर वाघळवाडीतील मयुरी महादेव सावंत झाली पीएसआय.
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वरनगर : केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे’ या वाक्याला साजेल असे उदाहरण पाहावयास समोर आले आहे.वाघळवाडी सोमेश्वरनगर येथील मयुरी महादेव सावंत हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI)निवड झाली आहे. राज्यांमध्ये मुलींमध्ये तिने बारावा क्रमांक मिळविला आहे.
वाघळवाडी गावातील पहिली महिला फौजदार होण्याचा मानही तिने मिळविला आहे. मयुरी सावंत हीने आपले पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण उत्कर्ष आश्रम शाळा वाघळवाडी येथे पूर्ण केले असून मेकॅनिकल इंजिनिरिंगचे शिक्षण माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळ येथे पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती.
गेल्या सहा वर्षापासून ती अभ्यासाची तयारी करत होती. मयुरीचे वडील महादेव सावंत हे उत्कर्षआश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहेत.
स्पर्धा परीक्षांसारख्या अवघड परीक्षेला सामोरे जाऊन त्यात यश मिळवणं,हे नक्कीच स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मयुरी सावंतचे आदर्श उदाहरण आहे.अभ्यासात सातत्य,प्रचंड परिश्रम,आणि चिकाटी हे या यशामागचे रहस्य असल्याचे तिने महान्यूजशी बोलताना सांगितले. एमपीएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर व तिची पीएसआयपदी निवड झाल्यानंतर मयुरीवर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.











