बारामती : महान्यूज लाईव्ह
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन तर दिले, पण दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून येत्या 5 जानेवारी रोजी राज्यातील विविध ठिकाणी जे जे धनगर बांधव उपोषणाला बसले होते, त्यांचा राज्यव्यापी मिळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती चंद्रकांत वाघमोडे यांनी दिली.
ऐन दिवाळीत चंद्रकांत वाघमोडे हे बारामतीत, तर इतर अनेक बांधव वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. चौंडी मध्ये देखील उपोषण झाले होते. दरम्यान दिवाळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले होते. मात्र धनगर आरक्षणाबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजातील उपोषण कर्त्यांच्या नेहमीप्रमाणे तोंडाला पाने पुसल्याचा आरोप वाघमोडे यांनी केला आहे.
वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐन दिवाळीत राज्याच्या विविध ठिकाणी धनगर समाजातील युवकांनी धनगर ST आरक्षण बाबतीत उपोषण केले होते. या उपोषणाला भरभरून प्रतिसाद मिळाला.उपोषणाची तीव्रता पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देऊन उपोषण सोडले.
या विषयावर उपोषणकर्त्यांशी हिवाळी अधिवेशनात 14 डिसेंबर रोजी नागपूर येथे चर्चा करण्याचे ठरविले होते. मात्र उपोषणकर्त्यांना 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता चर्चेचे निमंत्रण मिळाले.यामुळे अनेक उपोषणकर्ते वेळेत नागपूर येथे जाऊ शकले नाहीत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व धनगर समाजातील प्रस्थापित नेते यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे प्रस्थापित धनगर नेत्यांनी सांगितले.मात्र खरी काय चर्चा झाली याची माहिती उपोषणकर्त्यांना व धनगर समाजाला नीट मिळालीच नाही.
आता जे उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते, अशा सर्व उपोषणकर्ते व धनगर बांधवांचा राज्यव्यापी मेळावा 5 जानेवारी अनुज गार्डन शारदानगर बारामती येथे होणार आहे.या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे चंद्रकांत वाघमोडे यांनी सांगितले.











