बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीतील फटाफटीनंतर अजूनही संभ्रमात असलेल्या कार्यकर्त्यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागं केलं.. त्यांनी थेटच सांगितलं..आता आम्ही जो खासदार, आमदारकीला उमेदवार देऊ त्यालाच मतदान करायचं. ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी माझ्याबरोबर राहायचं. त्यांना त्यांचं नेतृत्व आवडेल, त्यांनी त्यांच्याकडे जायचं. पण आता इकडे आणि तिकडे एकच असं दोन डगरीवर हात चालणार नाही.
बारामतीतील जिजाऊ भवन येथे आज झालेल्या सरपंच, उपसरपंचांच्या मेळाव्यात अजित पवार यांना अखेर बोलावच लागलं. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीतील फटाफुटीनंतर सुरू असलेला संभ्रम त्यांनी अगदी थेटच बाजूला केला. त्यामध्ये त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतलं नाही, मात्र त्यांच्यावर त्यांनी टीका देखील केली.
आपण वयाच्या 65 नंतर आज जे केले आहे ते तुम्ही पाहत आहात, त्यांनी (म्हणजे शरद पवार यांनी) वयाच्या 35 मध्ये केलं होतं. यशवंतराव चव्हाणसाहेब नको म्हणत असतानाही वसंतदादा यांच्या विरोधात त्यांनी ते केलं. ते त्यावेळी चाललं मग आपलं चालायला काय हरकत आहे? असा सवाल देखील त्यांनी केला.
आणखी एक मुद्दा करत अजितदादांनी थेट चॅलेंज दिलं. जो विकास आपण चहुबाजूंनी केलेला आहे, तो कुणीच मायका लाल करू शकत नाही. आपलं त्यांना चॅलेंज आहे अशा शब्दात अजित पवार यांनी विकासकामांबाबत आपणच दादा आहोत हे थेट शब्दात स्पष्ट केलं.
जर आपण सत्तेत सहभागी झालो नसतो, तर व्यासपीठावर बसलेल्या केशवराव जगताप यांच्याकडे अंगुली निर्देश करत त्यांनी विचारलं, केशवराव, आपण कारखान्याचे जे प्रश्न सोडवत आहोत किंवा तुम्ही नीरा नदीत पाणी सोडायला सांगितलं, ते सुटलं असतं का? त्यावर केशवराव जगताप यांनी देखील व्यासपीठावर बसूनच.. हो हे खरे आहे असे स्पष्ट करत अजित दादांना दाद दिली.
तर दुसरीकडे आपण सत्तेत आहोत म्हणूनच आमदाराला फक्त पाच कोटी रुपयांचा निधी असला, तरी एकट्या सोनगावात आठ ते नऊ कोटी रुपयांचा निधी तुम्ही मागत आहात. ते धाडस केवळ सत्तेमुळेच होते असे त्यांनी सांगितले. आणखी एक तिरकस टीका करताना त्यांनी सांगितले, माझ्याही खूप ओळखी आहेत. पण आपण वडीलधाऱ्यांचा मान ठेवायचो. जाऊ द्या, कशाला आपण पुढे जायचे असे म्हणायचो. पण आता अमित भाई देखील आपला मान ठेवतात. मोदीसाहेब देखील आपली कामे करतात असे ते म्हणाले.
ते म्हणाले, आता मात्र एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यापुढील काळात कोणालाही दोन्हीकडे एकाच वेळी आपली निष्ठा ठेवता येणार नाही. जे असेल ते थेट आणि स्पष्टपणे होऊ द्या. यापुढील काळात ज्यांना माझ्या नेतृत्वावर विश्वास वाटतो, त्यांनी माझ्याबरोबर राहा व एकजुटीने काम करा. ज्यांना त्यांचं नेतृत्व आवडतं, त्यांनी त्यांच्या नेतृत्वात सहभागी व्हा. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि अधिकार आहे. मात्र आता दोन डगरीवर हात ठेवून चालणार नाही.











