शिरूर : महान्यूज लाईव्ह
त्या आरोपीने अनेकांना गंडविले..त्यानंतर पलायन केले अन् थाटात नवीन दुकान सुरू केले..मात्र पोलिसांनी थेट राजस्थान गाठून ठकास ताब्यात घेत अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आरोपी प्रताप परमार हा महादेव ज्वेलर्स या नावाने कारेगाव (ता.शिरूर) येथे सोन्याचे दुकान चालवत होता. काही दिवसानंतर आरोपी परमार याने अनेकांना गंडा घालत राजस्थान येथे पलायन केले होते.
आरोपी परमार याने सोनं गहाण ठेवणे, दुरुस्त करणे आदी कारणांसाठी सोने घेतले होते. याबाबत नागरिकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे सुमारे १५० हून अधिक नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस देखील आरोपीच्या शोधात होते.
पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली असता आरोपी राजस्थान सोडून मूळ गावी देखील नसल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी गोपनीय माहिती काढत असतानाच एका कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या पत्रिकेवर आरोपीचे नाव व पत्ता पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी गुजरात मध्ये जाऊन वेषांतर करत सदरील कपड्याच्या दुकानात बहाणा करत खात्री करत दुकानाच्या शेठ ला भेटायचे आहे असे सांगत मोठ्या शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीस अटक करून पोलिस कोठडीत पोलिसी खाक्या दाखवत गुन्ह्याची उकल केली. यावेळी आरोपीने नागरिकांकडून घेतलेले दागिने कारेगाव येथील ओंकार ग्रामीण निधी लि. या पतसंस्थेत तर काही दागिने दुकानाचा भागीदार कुमार चंद्रकांत ओव्हाळ याच्याकडे असल्याचे सांगितले.पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ५४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे ९१ तोळे दागिने जप्त केले आहे.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक महेश ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे,सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, माणिक काळकुटे, तेजस रासकर यांनी केली आहे.











