बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २३ डिसेंबर रोजी बारामतीत कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र श्रीनिवास पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी याची तयारी केली आहे. स्वतः शरद पवार या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याने या कुस्ती मैदानाकडे सर्वांचेच लक्ष आहे.
बारामती तालुका कुस्तीगीर संघ गेल्या काही वर्षांपासून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत कुस्त्यांचे मैदान आयोजित करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे मैदान होणार आहे. शनिवारी (ता. 23 रोजी) बारामतीत हे मैदान होणार असून, या मैदानातील कुस्तीगीरांना भव्य अशी बक्षिसे असणार आहेत.
बारामती शहरातील शारदा प्रांगण येथील मैदानात या कुस्त्या होणार आहेत. या मैदानाचे प्रमुख पाहुणे शरद पवार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक हे श्रीनिवास पवार असतील. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व मनजित खत्री आणि शिवराज राक्षे व सोनू कुमार यांच्या कुस्तीला पाच लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले आहे.
प्रकाश बनकर व हर्षद सदगीर आणि भारत मदने व माऊली जमदाडे यांच्या कुस्त्यांसाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या दिग्गज मल्लांसह अनेक मल्ल या मैदानात उतरणार आहेत. नामवंत मल्लांची कुस्ती होणार आहे.











