शिरूर : महान्यूज लाईव्ह
तब्बल दोन हजार लोकांना रोजगार देणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या फोर्जिंग कंपनीपैकी एक असलेला संकल्प फोर्जिंगचा कारखाना केवळ सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून गुजरातला स्थलांतरित करण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतला आणि 2000 कामगारांच्या कुटुंबावर संक्रात कोसळली.
या घटनेनंतर आमदार रोहित पवारांनी टीका केली, तर दुसरीकडे राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील सरकारला जागे करत या संदर्भातील बैठक आज बोलावली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील संकल्प फोर्जिंग प्रकरण आता चांगलेच तापले आहे. रस्त्याच्या कारणावरून सतत ब्लॅकमेल करत असल्याने संकल्प फोर्जिंग कंपनीने गुजरातला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकल्प इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एच आर विभागाचे प्रमुख कपिल यादव यांनी फिर्याद दिली असून, सुशांत कुटे हा सतत कंत्राट दिलं नाही, म्हणून महिन्याला दोन लाखाची खंडणी मागतो. कंपनीच्या विरोधात तक्रारी करून रस्त्याच्या कारणावरून वनखात्याकडे सतत मागणी करतो आणि कंपनीला ब्लॅकमेलिंग करतो.
या ब्लॅकमेलिंगला कंटाळून कंपनीने गुजरातला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात सरकारमधील कोणीही लक्ष घालत नाही अशी ही भावना कंपनीमध्ये होती, मात्र संकल्प कारखाना गुजरातला जात असल्याने खडबडून जागे झालेल्या सरकारने आता यामधील लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत आज नागपूरमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे.
यामध्ये या कंपनीच्या 100 मीटर एवढ्याच रस्त्यासाठी वनखात्याच्या जागेचा जो प्रश्न आहे, तो निकाली काढावा अशी मागणी केली जाणार आहे. याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी काल सरकारवर टीका केली होती. 20000 कोटी पासून 300000 कोटी पर्यंत ची गुंतवणूक महाराष्ट्रातून गुजरातला वळवणारे हेच सरकार जे संकल्प फोर्जिन प्रकरणी देखील उदासीनता बाळगून असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती.











