राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड. : दौंड तालुक्यात होणाऱ्या स्वतंत्र प्रांत कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज दौंड मध्ये येणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन भाजप आमदार राहुल कुल यांनी केले आहे.
मात्र या कार्यक्रमावर दौंड तालुक्यातील ओबीसी नेत्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आमदार कुल यांच्या कट्टर समर्थक असलेल्या ओबीसी नेत्यांचा समावेश असल्याने हा एक प्रकारचा आमदार कुल यांना घरचा आहेर असल्याची चर्चा या निमित्ताने तालुक्यात सुरू आहे.
आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यासाठी मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्वतंत्र उपविभागीय कार्यालय (प्रांत) मंजूर केले. त्यामुळे नवीन प्रांत कार्यालयाचा उद्घाटनचा कार्यक्रम व भव्य शेतकरी मेळावा रविवारी (दि १०) सायंकाळी ४ वाजता दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत.
मात्र मागील अनेक दिवसापासून सुरू असलेल्या राज्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने सभा सुरू आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी नेत्यांच्याही सभा सुरू आहेत. शनिवारी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ओबीसींची आरक्षण बचाव एल्गार सभा ही इंदापूर तालुक्यात झाली.
या सभेत अनेकांनी मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करायचे नाही, मराठा खासदार, आमदार आणि मंत्री यांच्या कार्यक्रमाला जायचे नाही असा निर्णय घेतला. त्यातच या सभेनंतर ओबीसी नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा समाजातील आंदोलकांनी चप्पलफेक केली.
याच पार्श्वभूमीवर दौंड मध्ये आज राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमावर तालुक्यातील ओबीसी नेते उपस्थित राहणार नसल्याचे चित्र आहे. आमदार राहुल कुल यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आम्हाला फोन केले आहेत. मात्र आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका पाटस येथे तालुक्यातील ओबीसी नेत्यांनी आणि समाजाने ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या उपस्थितीत घेतली. भाजप मधील ओबीसी नेत्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित न राहण्याची घेतलेली भूमिका ही आमदार राहूल कुल यांना एक प्रकारे घरचा आहेर असल्याची बोलले जात आहे.











