बारामती : महान्यूज लाईव्ह
आता बारामतीकरांना स्वादिष्ट घरचे जेवण उपलब्ध होणार आहे. बारामतीच्या २५ हून जास्त गृहिणींनी एकत्र येत बारामती,ज होममेड किचनचा उपक्रम सुरु केला आहे. १० डिसेंबरपासून या किचनमधून बारामतीकरांना बारामतीच्या सुगरणींच्या हातच्या खास डिशेस चाखायला मिळणार आहे.
या गृहिणी आपल्या स्वत:च्या स्वयंपाकघरात अगदी घरगुती पद्धतीने हे खाद्यपदार्थ बनविणार असून ग्राहकांच्या मागणीनूसार त्यांना घरपोच सेवा दिली जाणार आहे. यामध्ये शुध्द शाकाहारी घरापासून परंपरेने मासांहारी असणाऱ्या घरातील गृहिणींना समावेश असल्याने कोणत्याही प्रकारचे जेवण या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
सुरुवातीच्या काळात दु. १२ ते १.३० आणि रात्री ७ ते ८.३० ऐवढ्याच कालावधीत घरपोच सेवा दिली जाणार असून याव्दारे दुपारचे किंवा रात्रीचे भोजन दिले जाणार आहे. हा उपक्रम फक्त बारामती शहरापुरताच मर्यादित आहे. घरगुती चव आणि जादाची गुंतवणूक नसल्याने माफक दर हे या किचनचे वैशिष्ठ आहे. या उपक्रमाव्दारे महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे.
परंपरेने करत असलेलेच काम करायचे असल्याने कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही. घरची चव बिघडू नये यासाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींसाठीचे भोजन यापैकी कोणीतीही गृहिणी बनविणार नाही. सर्वसामान्य घरातील महिलांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या या अभिनव उपक्रमास प्रतिसाद देण्याची विनंती या उपक्रमाचे संयोजक घनश्याम केळकर यांनी केलेली आहे. (केळकर यांचा संपर्क : 9881098138)











