दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे गळित हंगाम सन २०२३-२४ मध्ये गाळपाकरिता येणाऱ्या ऊसास प्रतिटन रूपये ३ हजार देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, मागील व्यवस्थापनाच्या भ्रष्ट कारभारामुळे व त्यांनी कारखान्यावर केलेल्या हजारो कोटींच्या कर्जामुळे किसन वीर व खंडाळा कारखान्याची विश्वासार्हता धुळीस मिळालेली होती. कोणतीही बँक किसन वीर व खंडाळा कारखान्याला एक रूपयाचे कर्ज देऊ शकत नव्हती.
सभासद शेतकरी व कामगारांनी मोठ्या विश्वासाने कारखान्याची सूत्रे आमच्या व्यवस्थापनाकडे दिलेली होती. कारखान्यावर असणारी प्रचंड देणी व अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधुन जात असताना सभासदांच्या व कामगारांच्या विश्वासामुळेच मागील हंगाम सुरू करण्यास व सर्व देणी देण्यास आम्ही यशस्वी ठरलो.
यंदाचा हंगामही वेळेवर सुरू करू शकलो ते आपण सर्वांनी दिलेल्या योगदानामुळेच. ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या घामाला योग्य न्याय मिळाला पाहिजे, तो सुखी समृद्ध झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थक ठरेल, हेच उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन संचालक मंडळाच्या सभेमध्ये यंदाच्या गळीत हंगामात गाळपाकरिता येणाऱ्या ऊसास प्रतिटन रूपये ३ हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभासदांनीही ज्या पद्धतीने निवडणुकीत साथ देत कारखान्यास नवसंजीवनी देण्यासाठी निवडून दिले, त्याच पद्धतीने आपला संपुर्ण परिपक्व झालेला ऊस आपल्याच कारखान्याला गळीताकरिता देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे अध्यक्ष मदार मकरंद पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने केलेले आहे.











