नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
शाळेच्या मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार थेट राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांना शाळेतील काही मुलींनी पाठवली आणि त्यानंतर या घटनेला गांभीर्याने घेतले गेले. तेव्हा तब्बल 390 मुलींचे जबाब एका समितीने घेतले, त्यामध्ये तब्बल 142 अल्पवयीन मुलींनी मुख्याध्यापकांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केलाचा जबाब नोंदवला.
हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्याच्या भागात ही शाळा असून या शाळेतील मुलींनी चक्क राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महिला आयोगाला पत्र पाठवून आपल्यावरील अन्याय दूर करण्याची विनंती केली होती.
त्याची तातडीने दखल घेण्यात आली. यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि 30 ऑक्टोबर रोजी या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 4 नोव्हेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली. सध्या हा मुख्याध्यापक अटकेत आहे.
दरम्यानच्या काळात प्रांताधिकार्यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने संबंधित शाळेतील तब्बल 390 अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवले, तेव्हा त्यापैकी 142 मुलींनी गेल्या सहा वर्षात संबंधित मुख्याध्यापकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा नोंदवला, तर इतर मुलींनी या घटनेचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत या भयानक घडलेल्या घटनांची माहिती दिली.











