महान्यूज : आजची गझल
सारखी काळजी वाटण्यासारखे
कोवळे वय तुझे पाखरासारखे
जन्म व्याजावरी घेतल्यासारखा
दुःख हफ्त्यांमधे फेडल्यासारखे
आज काहीच लक्षात नाही तिच्या
फार होते कुठे ठेवण्यासारखे?
एकदा भेट तपशील ऐकायला
खूप आहे जवळ सांगण्यासारखे
काय अस्तित्व आहे तुझे माणसा?
जीर्ण भिंतीवरी पोपड्यासारखे..
एवढे दे मला फार काही नको
जन्मभर लोक सांभाळण्यासारखे
गझलकार-शिवम् पिंपळे, औरंगाबाद
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











