सुरेश मिसाळ: महान्यूज लाईव्ह
इंदापूर :बारामतीत रुग्णाच्या मृत्यूनंतर इंदापूरातही उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमधील महिला रुग्णाच्या मृत्यूवरून नातवाने डॉक्टर व परिचारिकांना काल मारहाण केली. या घटनेने डॉक्टर घाबरून गेले असून अशा परिस्थितीत काम कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. इंदापूर पोलिसांनी या प्रकरणी शेळगाव येथील सुरेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र संपूर्ण तालुक्यातील डॉक्टरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
इंदापूर पोलिसांनी शंकर सुरेश जाधव (रा. शेळगाव) याच्यावर शासकीय कामात अडथळा, साथ रोग प्रतिबंधक कायदा, मारहाण, शिवीगाळ, धमकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्या फिर्यादीनुसार १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता राऊंड घेत असताना ओपीडी आवाराजवळ असताना शेवंता सुभाष भोसले या महिला त्यांची आई हिराबाई सुरेश जाधव ( वय ५५ वर्षे यांना
दवाखान्यात अॅडमिट करण्यासाठी घेऊन आल्या. त्यावेळी डॉ. एकनाथ चंदनशीवे यांनी शेवंता भोसले यांना आजींना काय झाले आहे असे विचारून हिराबाई यांची तपासणी केली असता, त्यांची ऑक्सिजन लेव्हल ६० टक्क्यांहून कमी होती.
त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तातडीने त्यांना बारामती येथे घेऊन जाण्याची सूचना केली. मात्र शेवंता भोसले यांनी विनंती केल्याने इंदापूरातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमधील कर्तव्यावर असलेल्या डॉ. अनिरूध्द गार्डे यांना बोलावून कोरोना चाचणी करून तात्काळ उपचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
गार्डे यांनी हिराबाई यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील कोरोना कक्षात नेऊन दाखल करून उपचार सुरू केले. व्हेंटीलेटरद्वारे ऑक्सिजन देऊन औषधे देऊन त्यांचे हृदयाचे ठोके व ऑक्सिजन पातळी स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हिराबाई यांच्याकडून उपचारासाठी प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर शेवंता भोसले यांना बोलवून घेऊन प्रकृतीची माहिती दिली.
रात्री आठ वाजता हिराबाई यांचा मृत्यू झाला. तेव्हा शेवंता भोसले यांचे बंधू शंकर सुरेश जाधव हे तेथे आले व माझ्या आजींचा व्हेंटीलेटर का काढला असा प्रश्न केला व डॉ. गार्डे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यावळी कोरोना कक्षातील परिचारिका शीतल सोनवणे, राणी जाधव, सुषमा भोसले या समजावण्यासाठी पुढे आल्या, त्यांनाही मारहाण करीत डॉ. अनिरूध्द गार्डे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. व परिचारिकांना तुम्ही येथे नोकरी कशी करता तेच पाहतो, मी तुम्हाला खोट्या गुन्ह्यात नाही अडकवले, तर माझे नाव बदलून टाकीन अशी धमकी देत वैद्यकीय साधनांची फेकाफेकी सुरू केली. त्यानंतर सर्व कर्मचारी पळत सुटले, त्यांच्यापाठोपाठ सुरेश जाधव याने पाठलाग करीत कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
सोशल मिडीयातील व्हिडीओमुळे हा प्रकार?
व्हेंटीलेटर काढल्यानंतरही माणूस जिवंत असतो, डॉक्टर मुद्दाम असे करतात, दुसऱ्या एखाद्या रुग्णासाठी ते असे करतात अशा प्रकारची अफवा व गैरसमजाची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे. कोणत्यातरी दवाखान्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर फिरवला जात आहे, इंदापूरातही हा प्रकार अर्धवट ज्ञानातूनच झाला असला पाहिजे. आजींचा व्हेंटीलेटर काढला नसता, तर माझी आजी जिवंतच असती अशा प्रकारचा गैरसमज पसरल्यानेच हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काहीही असले तरी व्हाटसअप विद्यापीठावर वैद्यकीय क्षेत्रातील अर्धवट ज्ञान व डॉक्टरांविषयी कमालीची संतापाची भावना पसरवली जात असल्याने कोविड योध्द्यांविषयी अकारण गैरसमज पसरत आहेत. त्यातून अशा घटना घडत आहेत. सध्याच्या महामारीच्या काळात डॉक्टर व परिचारिका जीव धोक्यात घालून काम करीत असताना त्यांना मारहाण करण्याच्या घटना घडत असल्याने त्यावर विचार करण्याची वेळ आली आहे.











