बीड : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा वर्गाच्या विविध समस्यांसाठी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा चौंडी पासून सुरू झाली ती आज बीड शहरात पोहोचत आहे. आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनील भुसारा, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी या यात्रेत सहभागी आहेत.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील निर्वी येथे ही यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जन्मस्थळापासून 16 नोव्हेंबर रोजी ही यात्रा पुन्हा सुरू झाली आणि आता ती बीड जिल्ह्यात पोहोचली आहे. आज दुपारी या यात्रेचा बीड शहरात प्रवेश होईल.
१२ डिसेंबर रोजी नागपूर येथे या यात्रेचा समारोप होणार असून या निमित्ताने नागपूर येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस जेष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस असल्याने ही सभा जंगी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे.
चौंडी येथून सुरुवात झालेल्या यात्रेचे जामखेड शहरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मशाल मोर्चा काढण्यात आला. जामखेड शहरात तब्बल दोन तास या यात्रेची मिरवणूक सुरू होती. व्यापारी, स्थानिक नागरिकांसह आबालवृद्ध या यात्रेत सहभागी झाले होते. यानंतर पाटोदा शहरातही यात्रेचे स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी देखील रोहित पवार यांची मिरवणूक दीर्घकाळ चालली होती.











