विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
मूळचे बारामतीतील असलेले व राज्यभरात शासकीय स्तरावर अधिकारी म्हणून काम करत असलेल्या भूमिपुत्र अधिकाऱ्यांनी आपली बारामती आपली माणसं हा ग्रुप सोशल मीडियावर सुरू केला आहे. मागील दोन वर्षात त्यांनी विविध सामाजिक उपयोगी कामे केली आहेतच, परंतु यावर्षी त्यांनी केलेले काम आगळे वेगळे आहे. याची सुरुवात काल बारामतीतील आमराई परिसरात करण्यात आली.

विविध खात्यांमध्ये शासकीय अधिकारी म्हणून काम करत असलेल्या या भूमिपुत्रांनी मागील काही दिवसात नगरच्या स्नेहालय या संस्थेच्या वतीने बारामती शहरातील मुलांचा बौद्धिक व शैक्षणिक विकास या अनुषंगाने सर्वेक्षण केले. त्यामध्ये काही मुले त्यांना शाळाबाह्य आढळून आली, तर शाळेत शिकत असलेल्या काही मुलांना त्यांच्या इयत्तेनुसार त्यांची बौद्धिक प्रगती होत नसल्याचा निष्कर्ष निघाला. यामध्ये मुलांना अवांतर शिक्षणाची व मार्गदर्शनाची गरज असल्याचे दिसून आले. या सर्व अधिकाऱ्यांनी स्नेहालय संस्थेच्या तज्ञांसमवेत चर्चा करून यामध्ये नेमका मार्ग कसा काढायचा याविषयी चर्चा केली आणि त्यानंतर आकाराला आले ते बाल भवन!

बारामतीतील रमाई भवन च्या परिसरात हे बाल भवन नियमित सुरू केले जाणार आहे. त्याची सुरुवात आणि दीपोत्सव या निमित्ताने हे सर्व अधिकारी बारामतीत एकत्र आले आणि ज्या मुलांना या उपक्रमाची गोडी लावली जाणार आहे, त्या मुलांनाही एकत्रित करून त्यांनी दिवाळी भेट आणि दीपोत्सव हा उपक्रम आयोजित केला. या ठिकाणी आता बालभवन सुरू केले जाणार असून, यामध्ये मुलांना शिक्षणाची वाचनाची व लेखनाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.











