बारामती : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी कारखान्याचे काही वाद अजूनही न्यायालयात आहेत. तत्पूर्वीच कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याचे व तिचा कार्यक्रमही सुरू झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अर्थात ही अफवा कोणी पसरवली त्याची चर्चा सुरू असून, कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी यासंदर्भात आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.
दोन दिवसापासून इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून, मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान बारामतीच्या प्रांत अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कोणतीही निवडणूक जाहीर झाल्याचे पत्र प्रांत कार्यालयाकडून गेलेले नसल्याचे व ती एक अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले, मात्र यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी आक्रमक पवित्रा घेत ही अफवा पसरवण्यामागे एक कामगार असून कारखान्याच्या प्रमुखांपर्यंत त्याचे धागेदोरे आहेत असे पत्रकारांना सांगितले.
यासंदर्भात आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. व्हायरल करण्यात आलेल्या खोट्या पत्रानुसार 16 डिसेंबर रोजी मतदानाची अंतिम तारीख व 14 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची मुदत असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. हे मुद्दाम व्हायरल करण्यात आल्याचा आरोप पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे.











