दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगरकुशीत वसलेल्या कुसगाव येथील ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सीमा नारायण वरे यांना ग्रामस्थांनी विजयी केले .
त्यांनी श्री वाघेश्वरी ग्रामविकास पॅनेल मधून सरपंच या पदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला होता.
निवडणूक अटीतटीची व चुरशीची होती. पण काही झाले तरी विजय मिळवायचा निश्चय श्री वाघेश्वरी ग्रामविकास पॅनेलचे कुसगावचे माजी सरपंच शामराव घाडगे व माजी उपसरपंच जितेंद्र गोळे व स्थानिक ग्रामस्थांनी केला.
या निवडणुकीत सीमा वरे या बहुमताने विजयी झाल्या. प्रलंबित विकासकामांची तातडीने अंमलबजावणी करुन गाव विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून विकासाची कामे करण्यावर भर असल्याचे प्रचारातील प्रमुख मुद्दे ग्रामस्थांना पटल्याने त्यांनी सौ.सिमा वरे यांच्याकडे ग्रामपंचायतीची सत्ता सोपवली. याच पॅनेलचे राजाराम रामचंद्र वरे, सौ. उषा अर्जुन वरे, दशरथ सिताराम कळंबे हे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले.
नवनिर्वाचित सरपंच सीमा वरे यांनी सांगितले की, गावाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा होती. मात्र निवडणूक झाली. हे गाव आमदार मकरंद पाटील यांचे नेतृत्व मानणारे गाव आहे. आता निवडणूक संपली असून, विरोधी पॅनल मधील सर्वांसह ग्रामस्थांना बरोबर घेऊन गावची संस्कृती आणि गावचा विकास जपण्याचा व वाढवण्याचा आम्ही सारे जण प्रयत्न करू.











