केंद्र सरकारमधील लोक फोडाफोडी लक्ष देऊन करतात, पण शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या विचाराचे सूत्र आखण्यासाठी अर्थमंत्री काही करत नाही आणि पंतप्रधानही लक्ष देत नाहीत, शरद पवारांची गंभीर टीका!
बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामतीत व्यापारी असोसिएशनच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या दिवशी आयोजित केला जात असलेल्या पारंपारिक मार्गदर्शन मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले या दरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधानावर जोरदार टीका करत काही गंभीर आरोप केले.

आज बारामतीतील महावीर भवन येथे या व्यापारी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी व्यापारी संघटनेच्या वतीने हा मेळावा दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी आयोजित केला जातो. आज आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, धवल वाघोलीकर, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, उद्योजक सुशील सोमाणी, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बाजार समितीचे सभापती सुनील पवार, राजेंद्र गुगळे, वालचंद संचेती, बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय बोराडे, संजय संघवी आदींसह इतरही मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, या सरकारने सुसंवाद संपवून टाकला आहे. केंद्र सरकारने व्यापारी, शेतकरी धोरणाशी अजिबात संवाद ठेवलेला नाही. अर्थमंत्री तर कोणालाच भेटत नाहीत. संसदेतही एक तासही या विषयावर पंतप्रधानांनी चर्चा केली नाही. एरवी राजकीय पक्षांच्या पुढाफोडीत गांभीर्याने लक्ष देणारे हे सरकार व्यापारी व शेतकऱ्यांच्या धोरणात सूसूत्रता आणण्यासाठी अजिबात लक्ष देत नाही. त्यातून लोकांच्या समस्या वाढत आहेत.
यावेळी पवार म्हणाले, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात व्यापारी व सहकार क्षेत्रातील अनेक लोकहिताचे कायदे केले. शेतकरी व व्यापारी यांचा विचार करून व्यापार सुलभ पद्धतीने झाला पाहिजे आणि त्यातून शेतकरी व व्यापाऱ्यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले पाहिजे ही भूमिका त्या काळात राबवली गेली. मात्र आताच्या केंद्र सरकारचा या घटकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच सामंजस्याचा नाही. आज अर्थमंत्री आणि व्यापारी व्यावसायिक घटक यांच्यात कोणतीच चर्चा होताना दिसत नाही हा सुसंवादच या सरकारने संपवून टाकला. पंतप्रधानही यामध्ये लक्ष देत नाहीत. ते हस्तक्षेप करत नसल्याने अनेक समस्या उभ्या राहताना दिसत आहेत.
पवार पुढे असेही म्हणाले की, आजवर अनेक पंतप्रधान झाले, परंतु या पंतप्रधानांनी कधीही कोणत्याही राज्यात गेल्यानंतर तेथील मुख्यमंत्र्यांविषयी अनुचित उद्गार काढलेले नाहीत. मात्र आता इतर राज्यातील निवडणुकांच्या निमित्ताने त्या राज्यात जाऊन भाषण करणाऱ्या पंतप्रधानांना आपण सर्वांनी ऐकले आहे











