बारामती : महान्यूज लाईव्ह
पाऊस कमी, अडचणी फार! ऊस उत्पादकांच्या यावर्षी अडचणीत आणखीच भर पडलेली असताना माळेगाव येथील ऊस उत्पादक संजय जगताप यांनी मात्र त्यांच्या शेतात कमाल करून दाखवली आहे. गेली काही वर्षांपासून ते उसाचे उत्पादन घेतात. एकरी शंभर टनापर्यंत सरासरी उत्पादन घेणाऱ्या संजय जगताप यांनी यावर्षी तब्बल एकरी 137 टन उसाचे उत्पादन घेऊन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बारामती तालुक्यातील सोनकसवाडी येथील शेतकरी संजय जगताप यांनी एकरी 137 टन उत्पादन घेतले आहे. संजय जगताप यांनी 15 जुलै 2022 रोजी उसाच्या 86032 या वाणाची आडसाली लागवड केली होती. त्यांच्याकडे 18 एकर वडिलोपार्जित शेती असून ते केळी व उसाचे आलटून पालटून उत्पन्न उत्पादन घेतात. केळीच्या पिकानंतर त्याचा बेवड करून त्यात उसाची लागवड ते करतात. त्यामुळे त्यांची खताची गरज बऱ्यापैकी भागून जाते असे संजय जगताप यांनी सांगितले.
यावर्षी त्यांच्या एक एकर उसातून त्यांना तब्बल 137 टन उत्पादन मिळाले असून, सात फुटी उसाची पद्धत त्यांनी अवलंबली आहे. संजय जगताप यांनी सांगितले की, उसाला 40 ते 42 कांड्या असून, उसाची उंची 20 ते 22 फुटापर्यंत वाढलेली आहे. आम्ही दरवर्षीच 100 टनापर्यंत सरासरी एकरी उसाचे उत्पादन घेतो. यावर्षी त्यामध्ये वाढ झालेली आम्हाला पाहायला मिळाली. दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जगताप यांना अभिनंदन पत्र देखील पाठवण्यात आलेले आहे. (संजय जगताप यांचा संपर्क क्रमांक – 9822018655)











