बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा डंका पिटला गेला आहे. 31 पैकी 29 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जिंकलेल्या आहेत. अर्थात कार्यकर्त्यांनी मात्र अजित पवार किंवा शरद पवार गट असे न मानता आम्ही सर्व पवार कुटुंबाचे अशा स्वरूपाची देखील मते व्यक्त केली, परंतु बहुतांश वेळा जयघोष मात्र अजितदादांच्या नावाचा होत होता.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या काटेवाडी देखील राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला. या ठिकाणी महायुतीत असून देखील भाजपने त्यांचा पॅनल उभा केला होता. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने चित्र दाखवले जात होते आणि निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
बारामती तालुक्यातील पारवडीत भाजपने सत्ता राखली असून चांदगुडेवाडीत मात्र भाजपचा सरपंच विजयी झाला आहे. येथे राष्ट्रवादीला अनपेक्षित मोठा धक्का बसला आहे. चांदगुडेवाडीत भाजपचा सरपंच विजयी झाला असून, राष्ट्रवादीचे पाच तर भाजप गटाचे चार उमेदवार विजयी झाले. पारवडीत मात्र संपूर्ण सत्ता भाजपने राखली. तब्बल नऊ जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले, या ठिकाणी सरपंच देखील भाजपचाच निवडून आला.
ही दोन गावे वगळता इतर गावांमध्ये राष्ट्रवादीने निर्विवाद सत्ता राखली. या सर्व गावांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये चुरशीच्या निवडणूक लढती झाल्या. भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवईमाळ, आंबी बुद्रुक, पानसरेवाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कडेपठार, काळखैरेवाडी, चौधरवाडी, वंजारवाडी, करंजेपूल, धुमाळवाडी, करावागज, सायंबाचीवाडी, कोऱ्हाळे खुर्द, शिर्सुफळ मेडद, सुपा, गुणवडी, डोर्लेवाडी या गावांमध्ये राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व राखले.











